जीवन प्रकाशमान करणारी गीता जादूचे पुस्तक आहे ः डॉ. मालपाणी गीता परिवाराच्या बालसंस्कार वर्गांचा संगमनेरात समारोप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सव्वाशेहून अधिक देशांमधील चाळीस लाख लोक गीता परिवाराच्या प्रयत्नातून गीता अध्यन करु लागले. कोविडच्या काळात गीता परिवाराने राबविलेल्यो लर्न गीता या उपक्रमाला वैश्विक पातळीवर मिळालेले हे यश खूप मोठे आहे. गीतेमधील शिकवण पटल्यानेच या पुस्तकाला जगातील गीताप्रेमींनी आपलेसे केले आहे. जीवनाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य असलेली आणि जीवन प्रकाशमान करणारी भगवद्गीता खरोखर जादूचे पुस्तक आहे, असे प्रतिपादन गीता विशारद व गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
गेल्या 23 मेपासून गीता परिवाराच्यावतीने संगमनेरमध्ये संस्कार वाटिका बालसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाचा सोमवारी (ता.30) सायंकाळी संस्कार बालभवनमध्ये समारोप झाला. यावेळी उपस्थित संस्कारार्थीशी संवाद साधताना डॉ.मालपाणी बोलत होते. यावेळी मंचावर सुवर्णा मालपाणी, श्रीकांत कासट आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ.मालपाणी म्हणाले की, संगमनेरमध्ये गेल्या 32 वर्षांपासून संस्कार वाटिकेच्या माध्यमातून बालसंस्काराचे मोठे काम सुरु आहे. गीता परिवाराला गीतेच्याच माध्यमातून मिळालेली ही प्रेरणा आहे. भगवद्गीतेच्या माध्यमातून नवनवीन विद्या व कला आत्मसात करण्याची प्रेरणा मिळते. या महान पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या जीवनात अमुलाग्र बदल झाले असून जादूची कांडी फिरावी असे अनेक अनुभव आपण घेतल्याचेही त्यांनी यावेळी संस्कारार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सांगितले.
यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना गीता पारंगत असलेल्या सुवर्णा मालपाणी यांनी गीता परिवाराच्या संस्कारवर्गात जे शिकलात त्याचा मनापासून सराव करण्याचा सल्ला दिला. आपल्यातील कला जीवनाला पैलू पाडणार्या ठरतात, त्याचे योग्य प्रशिक्षण घेवून त्यात पारंगत झाल्याने जीवानाला आकार प्राप्त होतो. गीता परिवाराच्या संस्कार वाटिकेच्या उपक्रमातून मुलांमधील अशाच विविध कलांना प्रशिक्षणाची जोड देण्याचा प्रयोग गेल्या तीन दशकांपासून राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
गेल्या आठ दिवसांपासून शहरातील विविध आठ केंद्रावर चाललेल्या संस्कार वाटिकामध्ये इयत्ता पहिले ते नववी या वयोगटातील पाचशे मुले सहभागी झाले होते. या सर्व केंद्रांवर कार्यरत असणार्या कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या उपक्रमात संजय कर्पे, कुंदन जेधे, राजश्री मणियार, भोलेश्वर गिरी, रुपाली रायकर, वल्लरी जेधे, ओम जोर्वेकर, पूजा दीक्षित, सरोज असावा, मालती गोर्डे, शकुंतला दायमा, ऋषीकेश कडूस्कर, राजश्री बेलापूरकर, पुष्पा चांडक, मंगल नावंदर, अभिजीत गाडेकर, अमित चांडक, कल्पेश मणियार, नंदा मेंद्रे, सुनंदा जाजू, प्रमोद मेहेत्रे, अविनाश गायकवाड, श्रद्धा गायकवाड, सायली गायकवाड, अरुणा पवार, नंदा बाहेती, रुख्मिणी लड्डा, संगीता गायकवाड, राणी भांदुर्गे, दीपांजली धामणे, प्रणिता बेल्हेकर, दर्शन जोशी, शंकर सातपुते, राऊत सर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख म्हणून दत्ता भांदुर्गे यांनी काम पाहिले. गीता परिवार संगमनेर शाखाप्रमुख कुंदन जेधे यांनी सादर केलेल्या जादूच्या प्रयोगांना मुलांनी मोठा प्रतिसाद दिला. शाखेचे कोषाध्यक्ष अभिजीत गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर संजय कर्पे यांनी आभार मानले.