संगमनेरातील रुग्णालयांमध्ये पुन्हा ‘ऑक्सिजन बाणी’ची स्थिती! वायुदूत बनून प्रांताधिकार्यांनी आणले पन्नास सिलेंडर; तर महसूल मंत्र्यांकडून समस्येचे मूळच नष्ट करण्याचे प्रयत्न..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर शहरात ऑक्सिजन अभावी सात जणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे जिल्हा यंत्रणेकडून संगमनेरला प्राप्त होणार्या ऑक्सिजन सिलेंडरमध्ये कपात झाल्याने संगमनेरात ‘ऑक्सिजन बाणी’ निर्माण झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात पुढील तासभर पुरेल इतका तर शहरातील अन्य रुग्णालयांमध्ये दुपारपर्यंतचाच ऑक्सिजन साठा शिल्लक असल्याने सध्या ऑक्सिजनवर असलेल्या नऊशेहून अधिक रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी प्रशासनासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा ‘हायअॅलर्ट’वर असून प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी प्रसंगावधान राखतांना ‘वायुदूता’ची भूमिका बजावित सिन्नरमधून तत्काळ पन्नास सिलेंडर मिळविले आहेत. मंत्री थोरात यांच्या कानउघडनीनंतर जिल्हा यंत्रणेनेही कपात केलेले सिलेंडर देण्याची तयारी दाखवली असून यासर्व गोष्टी जुळवून आणण्यात पुढील काही तासांचा वेळ जाणार असल्याने संगमनेरात तूर्ततः ‘ऑक्सिजन बाणी’ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणात गेल्या पंधरवड्यापासून धक्कादायक पद्धतीने मोठी वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तणावाखाली आल्या असतांनाच जिल्ह्यात ऑक्सिजनसह रेमडेसिवीर व अन्य काही औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. अशा स्थितीत प्रत्येक तालुक्यातील रुग्णांच्या संख्येनुसार त्यांना आवश्यक असलेले ऑक्सिजन व औषधे पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा यंत्रणेवर आली आहे. मात्र जिल्ह्यातील उपचाराधीन असलेल्या रुग्णांच्या तुलनेत ऑक्सिजन व औषधे मिळत नसल्याने जिल्ह्यात वारंवार या दोन्ही गोष्टींवरुन वादळ निर्माण होत आहे. उपलब्ध झालेल्या या दोन्ही गोष्टींचे वितरण करतांनाही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने सध्यातरी जिल्ह्यातील कोविडस्थिती अत्यंत भयानक अवस्थेत आहे.

अहमदनगर पाठोपाठ जिल्ह्यातील सर्वाधीक संपन्न आणि पायाभूत सुविधांची भरमार असलेल्या शहरांमध्ये संगमनेरचा समावेश आहे. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील कोविडचे संक्रमण वाढल्यानंतर अहमदनगर शहरानंतर संगमनेर तालुक्यातील जवळपास सर्वच डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स कोविड बाधितांनी तुडूंब भरली आहेत. या दोन्ही शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल असलेले बहुतेक रुग्ण गंभीर अवस्थेतील असल्याने त्यांच्यासाठी जिल्ह्याला अविरतपणे ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या स्थितीत राज्यातच ऑक्सिजनसह रेमडेसिवीर व अन्य औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. संगमनेर शहरातील विविध डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स व कोविड हेल्थ सेंटर्समध्ये आजच्या स्थितीत 1 हजार 300 हून अधिक रुग्ण दाखल असून त्यातील 916 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे.

शहरातील 36 ठिकाणी गंभीर अवस्थेतील कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. यासर्व रुग्णालयांना मिळून संगमनेरला दररोज 10 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. जिल्हा यंत्रणेकडून आज सकाळी संगमनेरला 250 किलो वजनाचे सोळा ड्युरो सिलेंडर मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात अहमदनगरमधील एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा होवून सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एका मोठ्या माध्यमाने दिल्यानंतर संगमनेरला येणार्या ‘त्या’ सिलेंडरमध्ये मोठी कपात करुन केवळ तिनच सिलेंडर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे संगमनेरात ‘ऑक्सिजन बाणी’ निर्माण झाली आहे. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या नव्वदहून अधिक रुग्ण दाखल आहेत. त्यातील बहुतेक सर्वच रुग्ण गंभीर अवस्थेतीत आहेत. या रुग्णालयात पुढील तासभर पुरेल इतकाच ऑक्सिजनसाठा शिल्लक आहे. उर्वरीत रुग्णालयांमधील ऑक्सिजनवर असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 826 हून अधिक आहे, या रुग्णालयांमध्येही आज दुपारपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा असल्याने संगमनेरात पुन्हा एका ‘बाका’ प्रसंग उभा राहीला आहे.

याबाबचा अंदाज मिळताच संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी ‘वायुदूता’ची भूमिका घेत जलद धावपळ करीत थेट नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून तत्काळ 50 ऑक्सिजन सिलेंडर प्राप्त केले असून त्यातून घुलेवाडीतील ग्रामीण रुग्णालयाची ऑक्सिजन समस्या आणखी काही तास टाळली आहे, तर जिल्हा यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या तीन मोठ्या ड्युरा सिलेंडरमधून शहरातील अन्य तीन मोठ्या रुग्णालयांचीही आत्ताची समस्या टाळली जात आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडूनही संगमनेरला विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा होण्याबाबत युद्धपातळीवरुन प्रयत्न सुरु झाले आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी जिल्हाधिकार्यांशी संवाद साधून संगमनेरच्या वाट्याच्या ड्युरा (मोठे) सिलेंडरमध्ये कपात केल्याने काय परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत त्यांना माहिती देण्यात आल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप निचीत यांनी आणखी काही सिलेंडर देण्याची तयारी दाखवली असून ते प्राप्त करण्यासाठी वाहनही रवाना करण्यात आले आहे. याशिवाय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने गुजरातकडे दहा मेट्रिक टन ऑक्सिजन घेवून निघालेला टँकर संगमनेरच्या दिशेने वळविण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून सायंकाळपर्यंत तो संगमनेरात पोहोचण्याची शक्यता आहे.

‘पक्षी जाय दिगंतरा। बाळकांसी आणी चारा॥’
राज्याचे महसूलमंत्री तथा संगमनेरचे पालक बाळासाहेब थोरात यांना जेव्हा संगमनेरातील ऑक्सिजन बाणीबाबत माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवून संगमनेरात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रयत्न सुरु केले आहेत. तूर्त समस्या दूर करण्यासाठी अन्य काही ठिकाणांसह घोटी येथील ‘एसएमबीटी’ रुग्णालयातूनही काही सिलेंडर मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. संगमनेरला दररोज आवश्यक असणारा 10 मेट्रिक टन ऑक्सिजन नियमितपणे मिळावा यासाठीही त्यांनी ‘एअर लिक्विड’ या कंपनीला साकडे घातले असून गुरुवारपासून या कंपनीकडून दररोज दहा मेट्रिेक टन ऑक्सिजन प्राप्त होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अहमदनगरला ऑक्सिजन पुरवठा करणार्या आयनॉक्स या मुंबईच्या कंपनीला अन्य जिल्ह्यात पुरवठा करण्याचे आदेश मिळाल्याने व त्याबदल्यात पुरवठा करणार्या ‘टीएनएस’ या कंपनीकडून त्यांचे ग्राहक असलेल्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयाला प्राधान्य दिले जात असल्याने संगमनेरात वारंवार ऑक्सिजनची समस्या निर्माण होत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्री थोरात प्रयत्नरत असून त्यांना यात यशही मिळाले आहे. राज्याचा भार असतांनाही त्यांचे हे प्रयत्न संत जनाबाईंच्या अभंगातील ‘पक्षी जाय दिगंतरा। बाळकांसी आणी चारा॥ घार हिंडते आकशीं। झांप घाली पिल्लांपासी॥ माता गुंतली कामासी। चित्त तिचें बाळापाशीं॥ वानर हिंडें झाडावरी। पिली बांधुनी उदरीं॥ तैसी आम्हांसी विठ्ठल माये। जनी वेळोवेळां पाहे॥’ या रचनेप्रमाणेच असून त्यांचे सगळे चित्त संगमनेरच्या नागरिकांवर व त्यांच्या आरोग्यावर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

