जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच ‘व्हेंटीलेटर’वर येण्यासारखी अभूतपूर्व स्थिती! ऑक्सिजन व रेमडेसिवीरच्या टंचाईत जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक रुग्णांची उच्चांकी भर.. आता रेमडेसिवीरसाठीही जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कठोर निर्बंधांच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात कोविडचा उद्रेक झाला असून कोविड इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यात तब्बल तीन हजारांहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. आजच्या अहवालातून राहाता व संगमनेर तालुक्यात कोविडचा अक्षरशः विस्फोट झाला असून या दोन्ही तालुक्यातून एकाच दिवशी तब्बल 619 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाथर्डी, कर्जत, कोपरगाव, नगर ग्रामीण, श्रीरामपूर व अकोले तालुक्यातून आज 140 पेक्षा अधिक रुग्ण आढल्याने या तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आता ‘व्हेटीलेटरवर’ आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील सक्रीय रुग्णांच्या संख्येनेही आज आज उच्चांक गाठला असून तालुक्यात 1 हजार 574 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्णसंख्येतही आज मोठी भर पडून ती आता 11 हजार 192 झाली आहे. जिल्ह्यातही आज 3 हजार 97 रुग्णांची भर पडली, त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 26 हजार 201 झाली आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही आता सतरा हजारांहून अधिक झाल्याने रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.


सर्वकाही खुलं सोडून संचाराला मनाई करणारा अनोखा आदेश बुधवारी रात्रीपासून राज्यात लागू झाला. त्याचे अपेक्षित परिणाम आज सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व ठिकाणी बघायला मिळाले. संचारबंदी लागू असतांनाही संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील नागरिक कोविडच्या प्रचंड संक्रमणाकडे दुर्लक्ष करुन केवळ हौसेखातर आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून संचाराला निघाल्याचे चित्र दिसले. अहमदनगरमध्ये तर खुद्द जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरुन संचारबंदीतही विनाकारण संचार करणार्‍यांकडे विचारणा केली. मात्र अत्यावश्यकच्या नावाखाली सरकारनेच आपल्या आदेशाचा फज्जा केलेला असल्याने त्यांनाही समान उत्तरे ऐकण्यातच धन्यता मानावी लागली. नागरिकांचा हा हलगर्जीपणा आज संपूर्ण जिल्ह्याच्याच मूळाशी उठल्यागत भयानक चित्रही आजच समोर आले आणि अहमदनगरच्या गेल्या वर्षभरातील कोविड इतिहासातील आजवरची सर्वाधीक उच्चांकी तब्बल 3 हजार 97 रुग्णसंख्या समोर आली.


आजच्या अहवालाने राज्यासह जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध कुचकामी असल्याचेही सिद्ध केले असून ‘सगळं बंद मात्र सगळं उघडं’ अशा संभ्रमावस्थेमुळे यंत्रणाही गोंधळली आहे. तर दुसरीकडे संक्रमणाचा वेग शिगेला पोहोचला असून कोविड बाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांसमोर आव्हान उभे केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात आजही रुग्णांच्या नातेवाइकांची ऑक्सिजनची खाट मिळवण्यासाठीची धावाधाव आणि रेमडेसिवीर लस मिळवण्यासाठीची धडपड असं वेदनादायी चित्र दिसून आलं, आजच्या उच्चांकी रुग्णसंख्येने ते अधिक गंभीर आणि भयानक झाले आहे हे मात्र निश्चित.


आज शासकीय प्रयोगशाळेचे 871, खासगी प्रयोगशाळेचे 829 व रॅपीड अँटीजेनद्वारा 1 हजार 397 अशा एकूण 3 हजार 97 जणांचे आजवरचे उच्चांकी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रात सर्वाधीक 675, राहाता 352, संगमनेर 267, पाथर्डी 195, कर्जत 190, कोपरगाव 177, नगर ग्रामीण 169, श्रीरामपूर 165, अकोले 147, नेवासा 134, पारनेर 133, शेवगाव 114, राहुरी व श्रीगोंदा प्रत्येकी 107, जामखेड 79, भिंगार लष्करी परिसर 46, इतर जिल्ह्यातील 27, लष्करी रुग्णालयातील 10 व इतर राज्यातील तीन अशा एकूण 3 हजार 97 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. जिल्ह्यातील आजच्या उच्चांकी रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 26 हजार 201 झाली आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्याही सतरा हजारांच्या पार गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांवरील ताण प्रचंड वाढला असून जिल्ह्यात ऑक्सिजनच्या खाटा आणि रेमडेसिवीर लशीचा तुटवडा कायम आहे.


काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील मोजक्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. मात्र ही स्थिती गेल्या पाच दिवसांतच बदलली असून आज जामखेड वगळता जिल्ह्यातील उर्वरीत तेराही तालुक्यातून शंभराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रात सरासरी 512 रुग्ण या गतीने 7 हजार 680, राहाता तालुक्यात सरासरी 183 रुग्ण या गतीने 2 हजार 750, संगमनेर तालुक्यात सरासरी 141 रुग्ण या वेगाने 2 हजार 122, कोपरगाव तालुक्यात सरासरी 140 रुग्ण या वेगाने 1 हजार 98, श्रीरामपूर तालुक्यात सरासरी 134 रुग्ण या गतीने 2 हजार 4, कर्जत तालुक्यात सरासरी 127 रुग्ण या गतीने 1 हजार 902, नगर ग्रामीण क्षेत्रात सरासरी 124 रुग्ण या वेगाने 1 हजार 860, राहुरी तालुक्यात सरासरी 106 रुग्ण या वेगाने 1 हजार 584 व अकोले तालुक्यात सरासरी 101 रुग्ण या गतीने 1 हजार 520 रुग्ण आढळले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांतच संपूर्ण जिल्ह्यात तब्बल सरासरी दररोज 2 हजार 86 रुग्ण या गतीने आत्तापर्यंत 31 हजार 295 रुग्णांची भर पडली आहे.


आता रेमडेसिवीरसाठीही ‘नियंत्रण कक्ष’!
गंभीर अवस्थेतील कोविड बाधितांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर या लशीचा राज्यासह जिल्ह्यातही मोठा तुटवडा आहे. जिल्ह्यातील अनेक डॉक्टर्स व मेडिकल चालक रुग्णांच्या गंभीर अवस्थेचा गैरफायदा घेवून त्यांना चढ्याभावाने या लशीची विक्री करीत असल्याने जिल्ह्यात रेमडेसिवीरची अभूतपूर्व कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन मात्र नावापुरत्या कारवाया करुन पुन्हा अजगर झोपेत गेला आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी रुग्णालयांपाठोपाठ आता रेमडेसिवीरसाठीही नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांच्यावर या कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली असून या कक्षासाठी 0241 – 2322432 हा क्रमांक जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात रेमडेसिवीर उपलब्ध न झाल्यास या क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 115647

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *