संगमनेरकर महिलांनो, सावधान! धुम स्टाईल चोरट्यांची संगमनेरात पुन्हा एन्ट्री..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
टाळेबंदीच्या आधीपर्यंत संगमनेरकरांना जवळपास नित्याच्या असलेल्या धुम स्टाईल चोर्या अपवाद वगळता गेल्या दहा महिन्याच्या काळात जवळपास थांबल्या होत्या. मात्र जसजशा तालुक्याच्या सीमा खुल्या झाल्या तसतशा या घटनाही पुन्हा घडू लागल्या आहेत. त्याची श्रृंखला शुक्रवारी संगमनेरातील उच्चभ्रु वसाहत समजल्या जाणार्या अभिनवनगरमधून सुरु झाली. या परिसरातील एक महिला आपल्या अंगणात रांगोळी काढत असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्यांचे दागिने ओरबाडीत पलायन केले. या घटनेने आपण सुरक्षित असल्याचा विश्वास मनात बाळगून दागिन्यांसह सहजतेने वावरणार्या महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता.19) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अभिनवनगरमधील श्रीराम मंदिराजवळ राहणार्या अरुंधती विजय रेंघे (वय 65) या आपल्या घरासमोर रांगोळी रेखाटीत होत्या. याच दरम्यान सावजाच्या शोधात असलेल्या दुचाकीवरील दोघा चोरट्यांची त्यांच्यावर नजर पडली. त्या दोघाही चोरट्यांनी पहिली चक्कर मारीत त्यांच्या गळ्यात सोन्याचे दागिने असल्याची खातरजमा केली आणि लागलीच माघारी फिरत क्षणात पाठमोर्या खाली बसलेल्या रेंघे यांच्या गळ्यातील दागिने ओरबाडीत तेथून पलायन केले.
अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने घाबरलेल्या त्या वृद्ध महिलेने आरडाओरड केली. त्याचवेळी पुढच्या बाजूला दुध घालणारा एक शेतकरी त्यांच्या मदतीसाठीही धावला, मात्र सराईत असलेले दोन्ही चोरटे तो पर्यंत सुसाट वेगाने तेथून पसार झाले होते. या घटनेतील प्रत्यक्ष चोरी सोडून बराचसा भाग परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून त्यातून दोन्ही चोरटेही दिसून येतात व घटनेनंतर धावलेल्या त्या शेतकर्याची छबीही दिसून येते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि शहर पोलीस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला.
शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेची नोंद तब्बल दहा तासांनंतर करण्यात आली. याप्रकरणी अरुंधती रेंघे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील वेळी त्यांच्या घराच्या दारासमोरुन दोघा अज्ञातांनी सोन्याच्या तारमध्ये गुंफलेले 28 सोन्याचे मणी आणि एक पदक असलेले दिड तोळे वजनाचे व शासकीय दरानुसार 30 हजार रुपये मूल्य असलेले मणी मंगळसूत्र ओरबाडून नेले. त्यानुसार दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकीता महाले यांच्याकडे देण्यात आला आहे. या घटनेच्या रुपाने टाळेबंदीच्या काळात बंद झालेल्या धुम स्टाईल चोर्यांना पुन्हा सुरुवात झाली असून महिलांमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
धुम स्टाईल चोर्यांचे प्रकार संगमनेरकरांना नवीन नाही. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडत असलेल्या या घटनांना कोविडच्या काळात ब्रेक लागला होता. मात्र आता सर्व व्यवहार पुन्हा एकदा सुरळीत झाल्याने अशा प्रकारे चोर्या करणारे चोरटे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. यापूर्वी घडलेल्या अशा असंख्य घटनांचे आजवर तपासच लागलेले नसल्याने पोलीस तपासातून आपला गेलेला ऐवज परत मिळेल अशी भाबडी आशा बाळगण्यापेक्षा ‘संगमनेरकर महिलांनो, सावधान. धुम स्टाईल चोरट्यांची संगमनेरात पुन्हा एन्ट्री झाली आहे’ असा संदेश प्रत्येक महिलेपर्यंत देण्याची वेळ आली आहे.