‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्गात नारायणगावच्या ‘दुर्बीणी’चा खोडा! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची स्पष्टोक्ती; पर्याय शोधल्यानंतर कामाला पुन्हा वेग..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे तथा माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतःच याबाबत खुलासा केला आहे. त्यानुसार या प्रस्तावित मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असताना नारायणगाव जवळील ‘खोडद’ येथे उभारलेल्या अवकाश दुर्बीणींचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पाचे काम पूर्णतः थांबले असून पर्यायी मार्ग शोधला जात आहे. लवकरच त्यातून तोडगा काढून या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम पूर्ववत सुरु होईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
शुक्रवारी (ता.4) अहमदनगर आणि नाशिक दौर्यावर आलेल्या केंद्रीय रेल्वे तथा माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुपारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी नाशिकरोड येथे रेल्वेसुरक्षा दलाच्या 40 व्या स्थापना दिन समारंभाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी केंद्र सरकारकडून राज्यात सुरु असलेल्या रेल्वेसंबंधीच्या विविध कामांची माहिती दिली. जिल्ह्यातील अहिल्यानगर, कोपरगावसह एकूण 132 रेल्वेस्थानकांच्या पुनर्निमाणाचे कामही सध्या सुरु करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय नाशिकमधून शेतमाल पाठवण्यासाठी रेल्वे वॅगन्स उपलब्ध करुन दिल्या जाणार असून कांदा, द्राक्ष, डाळींब व केळी उत्पादकांच्या मागणीनुसार विशिष्ट आकाराच्या बोगी तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पत्रकारांनी नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असताना अचानक ती थांबवण्यात आल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याबाबत बोलताना मंत्री वैष्णव यांनी या प्रस्तावित रेल्वेमार्गावर येणार्या नारायणगावमधील खोडद येथे 23 देशांनी उभारलेल्या दुर्बीणींचा अडसर निर्माण झाल्याची माहिती दिली. या क्षेत्रातून रेल्वेमार्ग पुढे नेण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पर्यायी मार्गाचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्यातून तोडगा काढून या मार्गाच्या कामाला पुन्हा वेग दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांना दिली.
नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था नसल्याबाबत विचारले असताना त्यांनी पुण्याच्या रेल्वेस्थानकांची क्षमता वाढवण्यासाठी चार टर्मिनल विकसित केले जात असल्याचे सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिकसह राज्यभरातून पुण्यासाठी रेल्वे येवू शकतील. सध्या नाशिक ते शिर्डी रेल्वेसेवेचे काम प्राधान्याने सुरु असून त्यामुळे नाशिकहून दक्षिण भारतातील शहरांमध्ये जाणे अधिक सोयीचे होईल. सद्यस्थितीत महाराष्ट्रातून दक्षिणेकडे जाण्यासाठी कोणताही थेट रेल्वेमार्ग नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणले. त्यांच्या या वक्तव्याने जवळजवळ बासनांत गेलेल्या ‘पुणे-नाशिक व्हाया संगमनेर’ या रेल्वेमार्गाबाबत पुन्हा एकदा आशा जागल्या आहेत.
तीन जिल्ह्यातील दुष्काळी भागांना विकासाचे स्वप्नं दाखवण्यासह अहमदनगर जिल्ह्याला महानगरांच्या त्रिकोणीय श्रृंखलेशी जोडणारा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा विषय नेहमीच अधांतरीत राहीला आहे. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून या मार्गाची मागणी असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेबोर्डानेही या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर गेल्या वेळच्या अर्थसंकल्पातही या रेल्वेमार्गासाठी जवळपास अडीच हजार कोटी रुपयांची भरीव तरतुद करण्यात आल्याने तीनही जिल्ह्यातील भूसंपादनाच्या कामांना मोठा वेग आला होता. मात्र अचानक नारायणगांवजवळील खोडद येथे 23 देशांनी उभारलेल्या दुर्बीणींचा तांत्रिक अडसर लक्षात आल्याने या मार्गासाठी सुरु असलेली भूसंपादनाची प्रक्रिया थांबण्यासह हा रेल्वेमार्गाचे भवितव्यच डळमळीत झाले होते.
त्यातच मध्यंतरीच्या काळात चाकणपासूनच हा मार्ग शिर्डीकडे वळवण्याचा घाट सुरु झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील व विशेष करुन संगमनेर व सिन्नर तालुक्यातील रेल्वेप्रेमींची मोठी निराशा झाली होती. त्यावर पर्याय शोधताना केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्रालयाने दहापदरी औद्योगिक महामार्गाची घोषणा करुन फूंकर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनी देण्यास शेतकर्यांकडून मोठा विरोध होवू लागल्याने आता पुन्हा एकदा पुणे-नाशिक सेमी हायस्पीडचा विषय जोर पकडू लागला आहे. त्यातून लवकरच पर्यायी मार्ग निघेल अशी या तीनही जिल्ह्यातील नागरिकांना अपेक्षा आहे.
प्रस्तावित असलेला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग 235 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर एकूण 24 स्थानकांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या तिनही जिल्ह्यातील शेतमालाची वाहतूक गृहीत धरुन रेल्वमार्गावर शितगृहांसह गोदामांची व्यवस्थाही प्रस्तावित आहे. भोसरी, चाकण आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीही या रेल्वेमार्गामुळे जोडल्या जाणार असल्याने त्यातून या जिल्ह्यांमधील बेरोजगारांना रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध होण्याची आशा आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग तडीस नेण्यासाठी जनआंदोलन उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे.