योगासनपटूंना छत्रपती पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न ः थोरात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या योगासन संघाला महसूल मंत्र्यांकडून शुभेच्छा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
योगासनांचे भारतातील स्थान खूप उच्च आहे, आता त्याला राष्ट्रीय खेळाची मान्यताही प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत राष्ट्रीय पातळीवर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये संगमनेरच्या खेळाडूंनी आपल्यातील नैपुण्यही सिद्ध करुन दाखविले आहे. खेलो इंडिया स्पर्धेच्या चौथ्या सत्रासाठी सध्या महाराष्ट्राच्या योगासन संघाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यांचा सराव पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून संगमनेरात पदकांचा वर्षाव होईल असा विश्वास व्यक्त करताना इतर खेळांप्रमाणे योगासनपटूंनाही राज्य सरकारचा छत्रपती पुरस्कार मिळावा यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे दिली.

पुढील महिन्यात हरिणायातील पंचकुला येथे खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होणार्या महाराष्ट्राच्या योगासन संघाचे सराव शिबिर संगमनेरात सुरु आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री थोरात आज धु्रव ग्लोबल स्कूलमध्ये आले होते, यावेळी बोलतांना त्यांनी वरील विधान केले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, अर्जुन पुरस्कार प्राप्त कुस्तीपटू काका पवार, तहसीलदार अमोल निकम, ज्येष्ठ उद्योगपती राजेश मालपाणी, ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मंत्री थोरात म्हणाले की, डॉ. संजय मालपाणी यांनी धु्रव ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देवून पुढील पिढी सक्षम घडवण्याचा ध्यास घेतला आहे. आपल्या मुलांमध्ये इतके चांगले गुण असतात हे कधीकधी पालकांच्याही लक्षात येत नाहीत. मात्र अशा विद्यार्थ्यातील गुण ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास काय घडते याचे उत्तम उदाहरण आज धु्रव ग्लोबल स्कूलमधील या विद्यार्थ्यांनी दाखवून दिल्याचे ते यावेळी म्हणाले.
खेलो इंडिया स्पर्धेसाठी सुरु असलेला हा सराव पाहून हरयाणात संगमनेरचा डंका वाजवून महाराष्ट्राचा झेंडा फडकाविण्याचे काम या विद्यार्थ्यांकडून घडणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. योगासनांचा राष्ट्रीय खेळात समावेश झाल्यानंतर आता राज्याच्या छत्रपती पुरस्कारांमध्येही त्याचा समावेश व्हावा यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी गेल्या दोन वर्षात जिल्ह्यापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या संघाने केलेली कामगिरी विशद् केली. राज्याच्या कानाकोपर्यातून निवडून आणलेली मुलं सातत्याने कठोर परिश्रम घेत आहेत, कोविडच्या काळातही या मुलांनी बायोबबलमध्ये राहून दिवसरात्र मोठी मेहनत घेतली, प्रशिक्षकांनी जीव ओतून त्यांना प्रशिक्षण दिले. या सर्वांचा परिपाक पुढील महिन्यातील खेलो इंडिया स्पर्धेत योगासनांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक सुवर्णपदके मिळविणारा संघ ठरेल असा विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुढील महिन्यात 4 ते 6 जून दरम्यान हरियाणात खेलो इंडिया स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 22 योगासन खेळाडूंची निवड झाली असून त्यात तब्बल 20 विद्यार्थी संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणार्या महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षण शिबिर सध्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरु आहे. आज या स्पर्धकांनी योगासनांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. योगासन प्रशिक्षक मंगेश खोपकर यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. राज्य प्रशिक्षक सुहास पवळे, सहाय्यक प्रशिक्षक स्वप्नील जाधव व किरण वाडेकर यांनी खेळाडूंची तयारी करुन घेतली.
