काजव्यांचा लखलखाट अनुभवण्यासाठी पर्यटकांची भंडारदर्याकडे पावले नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभाग, पोलीस व स्वयंसेवकांची जय्यत तयारी
नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले तालुक्यातील भंडारदर्याला काजव्यांची चाहूल लागली असून पर्यटकांची पावले हळूहळू भंडारदर्याच्या दिशेने झुकायला लागली असल्याने पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने जय्यत तयारी केली आहे.
भंडारदरा म्हणजे निसर्गाचा ठेवा असलेले पर्यटनस्थळ समजले जाते. या पर्यटनस्थळात वन विभागाच्यावतीने दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भंडारदर्याचा काजवा महोत्सव वन विभागाकडून रोखण्यात आला होता. आता कोरोनाचे वातावरण निवळल्यामुळे यावर्षी काजवा महोत्सवाची वन विभाग, हॉटेलचालक व जनतेने काजवा जोरदार तयारी केल्याचे निदर्शनास येत आहे.
यंदाचा काजवा महोत्सव 15 जूनपासूनच वन विभागाने जाहीर केला होता. मात्र काजवे अभयारण्यात दिसण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने पर्यटकांचा भ्रमनिरास झाला होता. आता मात्र शेंडी, मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, घाटघर, उडदावणे, पांजरे व मुरशेत परिसरामध्ये हिरडा, बेहडा, सादडा, करंजी व इतर जातींच्या काही झांडावर काजव्यांची चमचम मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने भंडारदर्याला खर्या अर्थाने काजव्यांची चाहूल लागल्याचे दिसून येत आहे. त्यातच 28 व 29 तारखेला पर्यटकांची काजवा महोत्सवासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता वन विभागाकडून पर्यटकांना काजव्यांच्या लीलया अविष्कारांचा आनंद घेता यावा म्हणून जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे निदर्शनास येत आहे. या महोत्सवात होणारी पर्यटकांची गर्दी बघता भंडारदरा परिसरातील हॉटेलधारक व टेंटधारकही सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांनी काजवा महोत्सवाचा आनंद शांततेत उपभोगावा असे आवाहन नासिक विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी केले आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदर्याचा काजवा महोत्सव आता जगप्रसिद्ध होत असून महाराष्ट्रासह परराज्यातूनही पर्यटक काजव्यांचा करिष्मा बघण्यासाठी आलेल्या पर्यटकाचे भंडारदरा नगरीत स्वागत करण्यात येत आहे. पर्यटकांनी प्लास्टिकचा वापर टाळत निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करावी.
– दिलीप भांगरे (सरपंच-शेंडी)