राहुरी शहरात दारुचे दुकान फोडून सहा लाख लांबविले दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा; श्वान पथकासही केले पाचारण

नायक वृत्तसेवा, राहुरी
चोरट्यांनी आता ग्रामीणकडून शहराकडे आपला मोर्चा वळविला आहे. सोमवारी (ता.6) मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी राहुरी शहरातील भरपेठेत असलेले दारुच्या दुकानचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लाखो रुपयांची रोख रक्कम पळवून नेली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात प्रचंड भीती पसरली आहे.

मनप्रितसिंग कथुरिया यांचे शहरातील नवीपेठ भागात मोटवाणी वाईन्स नावाचे दारुचे दुकान आहे. रविवारी रात्री मनप्रितसिंग कथुरिया हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अडीच वाजे दरम्यान दोघा चोरट्यांनी शटरचे दोन्ही कुलूप तोडले. यावेळी एका चोरट्याने दुकानात प्रवेश केला तर एकजण बाहेर थांबला होता. दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानाची उचकापाचक केली. यावेळी गल्ल्यातील सुमारे सहा लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

कथुरिया हे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी राहुरीच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलीस पथक मिष्का नामक श्वानाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मात्र ते जागेवरच घुटमळले. त्यामुळे कोणताही सुगावा लागला नाही. मनप्रितसिंग कथुरिया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 211 Today: 1 Total: 2168369

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *