वीरभद्र महाराजांना मुस्लीम बांधव देणार चांदीचा मुकूट
वीरभद्र महाराजांना मुस्लीम बांधव देणार चांदीचा मुकूट
नायक वृत्तसेवा, राहाता
राहाता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरातील भगवान शंकर देवतेच्या चरणी शहरातील मुस्लीम समाज बांधवांकडून लवकरच चांदीचा नवीन मुकूट अर्पण केला जाणार असल्याची माहिती मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने हाजी शफीक उर्फ मुन्ना रफीक शाह, हाजी इकबाल कालू शेख व असीफ मुनसब शेख यांनी दिली आहे.
राहाता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरातून दोन-तीन दिवसांपूर्वी देवाचे चांदीचे मुकूट व इतर साहित्य चोरीस गेले आहे. हे चांदीचे आभूषणे नव्याने बनवून देण्यासाठी अनेक दानशूर पुढे येत आहेत. यात मुस्लीम समाज बांधव सुद्धा कुठे मागे नाहीत. शहरातील उद्योजक व व्यावसायिक हाजी शफीक उर्फ मुन्ना शाह, हाजी इकबाल शेख व असीफ शेख या मित्रांनी एकत्रित येवून समाज बांधवांशी संवाद साधून स्वखर्चाने वीरभद्र महाराज मंदिरातील भगवान शंकराच्या मूर्तीचा चोरीस गेलेला चांदीचा मुकूट नव्याने बनवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हाजी शाह यांनी तात्काळ देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ यांना कल्पना देत चोरीस गेलेला चांदीचा मुकूट नवीन बनवून देण्याचा निर्णय मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने घेतला असल्याचे सांगितले. मुस्लीम समाज बांधवांनी नवीन चांदीचा मुकूट बनवून देण्यासाठी स्वेच्छेने घेतलेला पुढाकार हा हिंदू-मुस्लीम समाज बांधवांच्या ऐक्याचे दर्शन आहे.