ध्येयपूर्तीसाठी फक्त जिद्द व चिकाटी अंगी बाळगा ः सारडा संगमनेर महाविद्यालयात वाणिज्य महोत्सवाचा समारोप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामान्य लोकांचे विचार जिथे संपतात, उद्योजकांचे विचार तेथून पुढे चालू होतात. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, सातत्यपूर्ण प्रयत्न व योग्य निर्णक्षमतेची जोड हवी. ध्येयपूर्तीसाठी फक्त जिद्द व चिकाटी अंगी बाळगा, तुमच्या भविष्याला योग्य दिशा मिळेल, असे प्रतिपादन प्रतिथयश उद्योजक विक्रम सारडा यांनी केले.

संगमनेर महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे आयोजित वाणिज्य महोत्सवाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, पदव्युत्तर विभाग प्रमुख प्रा. एल. बी. मालुसरे, वाणिज्य महोत्सवाच्या कार्याध्यक्षा प्रा. सारीका पेरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना उद्योजक सारडा म्हणाले, उद्योजकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण आणि कल्पक विचारांचा ध्यास घ्यायला हवा. या नाविन्यपूर्ण आणि कल्पक विचारांवर ठाम राहायला शिकले तर निश्चितच यशस्वी होता येते. विद्यार्थी दशेतच या सर्व गोष्टींचा विचार करण्याचे त्यांनी आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी विद्यार्थ्यांना संघर्ष व्यवस्थापनाची विविध उदाहरणे देत बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नियोजन आणि अंमलबजावणी याबाबत नेहमीच जागरुक राहून या महाविद्यालयीन कालखंडात स्वतःला सिध्द करावे. तसेच शरीर, बुध्दी आणि मन यांची एकरुपता यश मिळवून देते. यासोबत ज्ञान, कौशल्य, चिकाटी व नवोपक्रम या अंगभूत कलागुणांना वाव द्या. तुमची कल्पकता आयुष्यात तुम्हाला नक्कीच यशस्वी उद्योजक बनवेल असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना दिला व अतिशय खेळीमेळीच्या वातारणामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी वाणिज्य विभागाच्या प्रगतीचा आलेख मांडला व या महोत्सवाचा हेतू सांगून त्यातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य महोत्सव एक खुले व्यासपीठ आहे, त्यातील स्तुत्य उपक्रमामध्ये असाच सहभाग नोंदवा व येणार्‍या संधीचे सोने करा असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वाणिज्य विभागातील सर्वात मानाची अशी अभिनव स्पर्धा मिस्टर व मिस कॉमर्स पार पडली. यावर्षी मिस्टर कॉमर्स म्हणून विश्वकर्मा साहिल लालचंद तर मिस कॉमर्स म्हणून कुर्डे ऋतुजा श्याम यांची निवड करण्यात आली. बेस्ट कॉमर्स स्टुडंट ऑफ द इयर हा सन्मान अंजुषा कासार या विद्यार्थिनीस मिळाला. तिला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत व पवार सायकल डीलर्सच्या सौजन्याने गोकुळ पवार यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. हेमलता तारे व प्रा. शहाजी लेंडे यांनी केले तर आभार प्रा. ए. जी. गोसावी यांनी मानले.

Visits: 135 Today: 2 Total: 1416209

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *