पेन्शन हा शिक्षकांचा अधिकार असून त्यांना मिळालाच पाहिजे ः डॉ. तांबे संगमनेरात महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचा मेळावा संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षण क्षेत्राचा अत्यंत मोलाचा वाटा असून या क्षेत्रात काम करणार्या शिक्षकाचे योगदान विसरता कामा नये. पेन्शन हा शिक्षकांचा अधिकार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.

संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. मनीषा कायंदे, आमदार डॉ. किरण लहामटे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार, उपाध्यक्ष प्रा. शशीकांत माघाडे, अकोल्याचे प्रा. प्रकाश वानखडे, प्रा. हिरालाल पगडाल, उमेश गुंजाळ, मुस्ताक सय्यद, नागपूरहून डॉ. चोपकर, मेहकर, अभय पाटील, मुंबईचे दिलीप काळुसे, रत्नागिरीचे डॉ. आनंद आंबेकर, डॉ. दीपक गायकवाड, रमेश शेंडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, शिक्षक हा आपल्या लोकशाहीतील प्रमुख आधारस्तंभ असून शिक्षकांच्या रास्त मागण्यांचा विचार केला पाहिजे या भावनेने आघाडी सरकारने पेन्शनपासून वंचित ठेवलेल्या शेकडो प्राध्यापकांना दिवाळी भेट म्हणून पेन्शन सुरू केली आहे. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला असल्याने आपण हा प्रश्न विधीमंडळात मांडू शकलो आणि त्यात यश आले असेही ते म्हणाले. तर आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, विधीमंडळात लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे आणि संविधानाचा आदर केला पाहिजे. कठीण प्रश्न विधीमंडळात सुटू शकतात याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे.

मनीषा कायंदे म्हणाल्या, शिक्षकांनी आपल्या अन्यायाविरुद्ध गप्प न बसता शेवटपर्यंत लढा दिला पाहिजे. प्रत्येकाला न्याय मिळेल सरकार आपल्या पाठीशी असून पेन्शनसाठी लढणे हा शिक्षकांचा न्याय हक्क आहे. तर डॉ. विजय पवार म्हणाले की पेन्शनच्या लढ्याचा अग्रभागी असणार्या सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच एम. फील व नेट-सेटग्रस्त प्राध्यापक यांना लवकरच न्याय मिळेल.

याप्रसंगी डॉ.अनिल शितोळे, अशोक कुवर, पांडुरंग देशमुख, सुनील सांगळे, लक्ष्मीकांत चोपकर आदिंनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नीलेंद्र लोखंडे, डॉ. अजय कांबळे, डॉ. मुनीष पांडे, प्रा. संदेश डोंगरे, डॉ. वैशाली घोडेस्वार, प्रा. एन. के. पाटील, प्रा. अब्दुल चौधरी, प्रा. विजय हिले, डॉ. बी. के. काकड, प्रा. संजय दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले. संगमनेरच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अॅड. अमित सोनवणे, पत्रकार गौतम गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत वामन, हेमंत मेढे, विनोद गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन एस. एन. कॉलेज मुंबई येथील प्रा. शशीकांत माघाडे यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. निर्मला पवार यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अजय कांबळे यांनी केले.
