‘पुणे-नाशिक’ सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला ‘अखेर’ अंतिम मान्यता! निती आयोगासह केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; केंद्रीय निधीचा मार्गही झाला खुला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांना अतिशय फायद्याचा ठरणारा व संगमनेर तालुक्याच्या विकासातील मैलाचा दगड ठरणार्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला अखेर अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात रेल्वे मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत या मार्गातील मंजुरीचा अखेरचा अडसरही बाजूला सारण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वे विभागाकडून मिळणार्या 20 टक्के निधीचा मार्गही आता प्रशस्त झाल्याने या लोहमार्गाचे काम लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या मार्गासाठी लागणार्या एकूण खर्चातील प्रत्येकी 20 टक्के निधी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणार असून उर्वरीत 60 टक्के रक्कम खासगी कर्जातून उभी केली जाणार आहेत, राज्य सरकारने यापूर्वीच आपल्या वाट्यातील 20 टक्के निधी ‘महारेल’कडे सुपूर्द केला आहे.
रेल्वे कार्पोरेशनच्या संचालकांसह रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी व निती आयोगाच्या सदस्यांची गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता.28) रेल्वे मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा विषय चर्चेत होता. यावेळी महारेलच्या प्रकल्प संचालकांनी या रेल्वेमार्गाचे सादरीकरण केले. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर रेल्वेच्या संचालकांसह निती आयोगाने या लोहमार्गाला अंतिम मान्यता दिली. त्यामुळे या रेल्वेमार्गातील सर्वात मोठा अडथळा बाजूला सारला गेला असून रेल्वेकडून मिळणारा 20 टक्के निधीही लवकरच महारेलकडे सुपूर्द होणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरातच या रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
राज्यासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी ठरणार्या या रेल्वेमार्गासाठी पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील एकूण 1 हजार 470 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. त्यासाठी राज्यात पहिल्यांदाच थेट शेतकर्यांच्या बांधावर जावून त्यांच्याशी चर्चा करुन थेट जमिनीची खरेदी केली जाणार आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला पैसा राज्य व केंद्राच्या प्रत्येकी 20 टक्के निधीतून उभा होणार आहे. राज्य सरकारने आपल्या वाट्यातील 20 टक्के रक्कम यापूर्वीच महारेलकडे सुपूर्द केली आहे. आता केंद्रीय निती आयोगानेही आपल्या हश्शाची रक्कम देण्यास अंतिम मान्यता दिल्याने या रेल्वेमार्गातील बहुतेक अडथळे बाजूला झाले आहेत.
पुणे ते नाशिक या 235 किलोमीटर अंतरासाठी एकूण 16 हजार 39 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. देशात पहिल्यांदाच तयार होणारा सेमीहायस्पीड रेल्वेमार्ग ठरणार्या या मार्गावरुन ताशी दोनशे किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार असल्याने पुण्याहून नाशिकचे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूकही कमी होईल आणि शेतकर्यांना आपला शेतमाल महानगरांमध्ये नेण्याची सोयही या माध्यमातून होणार असल्याने हा रेल्वेमार्ग बहुप्रतीक्षीत बनला आहे. संगमनेरसारख्या डोंगरी तालुक्यातून जाणारा जवळपास पन्नासहून अधिक किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग प्रगतीची नवी कवाडे उघडणारा ठरेल. या माध्यमातून तालुक्यातील रोजगारांमध्ये वाढ होऊन शेतकर्यांच्या घरातही समृद्धी नांदणार आहे. या मार्गासाठी सुरुवातीपासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, समीर भुजबळ व विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला. त्याला आता तब्बल तीन दशकानंतर यश मिळाले आहे.