शेलविहिरे येथील खून प्रकरणातील आरोपीस रांजणगावातून अटक यापूर्वी दहा वर्षांचा कारावास भोगला; न्यायालयाकडून पाच दिवसांची कोठडी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील शेलविहिरे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीच्या रांजणगाव (जि.पुणे) येथून मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

खून झाल्यानंतर घटनास्थळी तत्काळ अप्पर पोलीस अधिक्षीका स्वाती भोर, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, अकलेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, राजूरचे नरेंद्र साबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकातील पोना. अण्णासाहेब दातीर, पोकॉ. अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, पोना. फुरकान शेख यांचे तपास पथक तयार करुन त्यांना आरोपीचा कसून शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून व मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी जगन्नाथ भागा आडे (वय 46) हा रांजणगाव (ता.शिरूर, जि.पुणे) येथे वास्तव्य करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सदर ठिकाणी रवाना होऊन सदर परिसरातील जवळपास 15 चाळी, लॉजेस, हॉटेल, मेस व रेस्टॉरंट येथे आरोपीचा शोध घेतला. स्थानिक लोकांना आरोपीचे फोटो दाखविले असता फोटोतील आरोपी हा एका खोलीमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून राहत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी राहत असलेल्या ठिकाणी पथकाने सापळा लावून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याची पत्नी रंजना जगन्नाथ आडे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निर्घृणपणे खून केल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी देखील आरोपीने पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर हल्ला करून गंभीर दुखापत केली होती. त्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस न्यायालयाने दहा वर्षांचा कारावास देखील सुनावला होता. या प्रकरणात त्यास न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *