शेलविहिरे येथे संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून मुलाच्या फिर्यादीवरुन वडीलांविरोधात राजूर पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील शेलविहिरे येथे संशयाच्या कारणावरून पत्नीचा पतीने धारदार हत्याराने निर्घृण खून केला. त्यानंतर तो घराला कुलूप लावून पसार झाला. दुसर्‍या दिवशी जेव्हा मुलाने घराचे कुलूप उघडले तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी (ता.19) जा़लिंदर आडे (वय 26) हा कामासाठी बाहेर निघाला असता आई रंजना जगन्नाथ आडे (वय 42) व वडील जगन्नाथ भागा आडे यांच्यामध्ये भांडण चालू होते. त्यावेळी जालिंदरने दोघांना समजावून सांगितले व तो कामासाठी घराबाहेर पडला. रात्री 8 वाजता तो घरी आला असता घराला कुलूप दिसले असता त्याला वाटले आईवडील गेले असतील. कोठेतरी बाहेर गेले असतील असा विचार करून जालिंदर आपल्या मावस भावाकडे डोंगरवाडी येथे गेला. त्यानंतर जालिंदरने वारंवार संपर्क करूनही आईकडून प्रतिसाद मिळत नव्हता. आईवडीलांची पार्श्वभूमी पाहता मुलाला संशय आला, त्यामुळे मावस भावाला घेऊन तो शेलविहिरे येथे गेला तर घराला कुलूप होते. त्यामुळे त्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी त्याला आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

आईचा मृतदेह पाहून त्याने एकच टाहो फोडला. वडीलांचे आईबरोबर सकाळी सुरू असलेले भांडण पाहता मुलाला वडीलांचा संशय आला. त्यामुळे देवगाव येथून मामाला घेऊन आला व त्यांनी राजूर पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर मुलगा जालिंदर आडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी वडील जगन्नाथ भागा आडे याच्या विरोधात गुरनं. 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस करीत आहे.

Visits: 175 Today: 1 Total: 2128720

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *