हनिमूननंतर नवरीने पावणे चार लाख घेऊन केला पोबारा मूळ राहुरीच्या तरुणाची फसवणूक; लोणी पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, राहाता
मराठवाड्यातून आलेल्या एका तरुणीने बाभळेश्वर (ता.राहाता) येथील तरुणाशी लग्नही केले, हनिमूनही केला आणि विश्वास संपादन करून 3 लाख 70 हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अमर एकनाथ जेजूरकर (वय 34, मूळगाव तनपुरे गल्ली, राहुरी) हा बाभळेश्वर येथे मामाकडे राहून मोलमजुरीचे काम करायचा. सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने गावागावात अनेक अविवाहित तरुण दिसत आहेत. अमरला मात्र बायको मिळाली. अश्विनी (रा. हेळस, जि. जालना) ही तरुणी आणि तिची मावस बहीण रूपा यांचा अमरशी संपर्क झाला. अश्विनीशी त्याचा विवाह निश्चित झाला आणि बाभळेश्वर येथे 4 एप्रिलला लग्नही झाले. लग्नानंतर ते कोल्हापूरला हनिमूनला गेले. दोन-चार दिवस त्यांचे मजेत गेले. मात्र 30 एप्रिलला कोल्हापूरच्या बसस्थानकावरून अश्विनी आणि रूपा पसार झाल्या.
जाताना त्यांनी लग्नासाठी केलेले 70 हजार 915 रुपयांचे दागिने आणि 3 लाख रोख रक्कमही नेली. अमर घरी आला आणि त्याच्या लक्षात आले की आपल्याला विश्वास संपादन करून गंडवण्यात आले आहे. त्याने लोणी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अलीकडे अशाप्रकारे लग्नाचे नाटक करून अनेकांना फसवल्याच्या घटना वाढत आहेत. मुलीच मिळत नाहीत अशी सर्वत्र परिस्थिती आहेत. अनेकजण पैसे देऊन इतर जिल्ह्यातील मुलींशी विवाह करीत आहेत. परंतु लग्नाच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक करणार्या काही टोळ्या याचा फायदा उठवत असून सावध, सतर्क आणि डोळसपणे या गोष्टी करण्याची गरज आहे.