घरात घुसून ज्येष्ठ विधीज्ञाला सहा जणांची बेदम मारहाण! संगमनेरच्या विद्यानगरमधील घटना; डोळा निकामी झाल्याची तक्रार, एकाला अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
किरकोळ कारणावरुन केवळ मनात राग धरुन सहा जणांनी मिळून संगमनेरातील एका ज्येष्ठ विधीज्ञाला त्यांच्या राहत्या घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित विधीज्ञ गंभीर जखमी झाले असून त्यांचा डोळाही निकामी झाल्याचा दावा तक्रारीतून करण्यात आला आहे. या प्रकरणी जखमी वकीलाच्या मुलाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवर पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयासमोर उभे केले असता 23 मे पर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. जखमी झालेल्या ज्येष्ठ विधीज्ञावर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शहरातील गजबजलेल्या विद्यानगर भागात गेल्या बुधवारी (ता.18) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेले संगमनेरातील ज्येष्ठ विधीज्ञ सुरेश खिडके हे दुपारच्यावेळी आपल्या घरात असताना तेजस विजय खर्डे या त्याच भागात राहणार्या तरुणाने त्यांच्या घराच्या दारापुढे दुचाकी उभी केली. त्यावर संबंधित विधीज्ञांनी घरात येण्या-जाण्याचा रस्ता असल्याने दारात गाडी लावू नकोस अशी सूचना संबंधित तरुणाला केली. त्याचा राग येवून त्याने त्या विधीज्ञाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातून शाब्दिक वाद वाढला.
त्यानंतर सदर तरुणाने फोन करुन आपले अन्य पाच साथीदार निखील शिंदे, चिव्या कळंबे (दोघेही रा.शिवाजीनगर) व इतर अनोळखी तीन इसमांना घटनास्थळी बोलावून घेतले. यावेळी या सर्व सहा जणांनी विधीज्ञ सुरेश खिडके यांच्या घरात घुसून त्यांना फ्री-स्टाईल लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी तेजस खर्डे याने त्या विधीज्ञाच्या तोंडावर जोराची फाईट मारल्याने त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यानंतरही या सर्वांनी संबंधितास शिवीगाळ करीत पुन्हा आमच्या नादाला लागायचे नाही असे दरडावित त्यांना धमकी दिली. या प्रकारानंतर जखमी विधीज्ञ सुरेश खिडके यांना उपचारासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी जखमीचा मुलगा ब्रह्मरुप सुरेश खिडके यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी वरील सहा जणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 326, 452, 143, 147, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार असलेल्या तेजस विजय खर्डे याला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली असून आज त्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभे केले असता या प्रकरणातील अन्य सहभागी असलेल्या उर्वरीत पाचही आरोपींबाबत पोलिसांना पूर्ण माहिती नसल्याने त्यांच्या शोधासाठी न्यायालयाने त्याला 23 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे करीत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घटनेने शहरातील वकीलांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी सखोल तपास करुन सर्व आरोपींना कायद्याचा धाक दाखवण्याची मागणी होत आहे.
सदरचा प्रकार अतिशय निंदनीय असून कायद्याची बाजू मांडणार्या वकीलांवर अशा प्रकारचा हल्ला सहन केला जावू शकत नाही. सुसंस्कृत शहरात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही संगमनेर वकील संघाच्यावतीने पोलीस निरीक्षकांना निवेदनही दिले असून या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. संगमनेरातील सर्व वकील अॅड. सुरेश खिडके यांच्यासोबत असून लवकरात लवकर त्यांना स्वास्थ लाभावे अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना.
– अॅड.सुहास आहेर
अध्यक्ष-संगमनेर वकील संघ