गोधेगावमध्ये शेतकर्याचा सहा एकर ऊस आगीत खाक लाखो रुपयांचे नुकसान; पंचनामा करुन भरपाईची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील गोधेगाव येथील भाऊसाहेब तुकाराम खोबरे यांच्या शेतातील सुमारे सहा एकर ऊस नुकताच शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. यामुळे शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गोधेगावातील गट क्रमांक 173/2 हा भाऊसाहेब खोबरे व गट क्रमांक 173/3 हा मंगलबाई भाऊसाहेब खोबरे यांच्या नावे आहे. यामध्ये उसाचे सुमारे सहा एकर पीक आहे. सदर शेतात विद्युत पुरवठ्याचे तीन खांब असून विद्युत तारेला झोळ पडल्याने वीज पुरवठा सुरू असताना तारांचा एकमेकींना स्पर्श होऊन विजेच्या ठिणग्या पडून उसाला आग लागली. या आगीत शेतकरी खोबरे यांचा सुमारे सहा एकर ऊस जळाला.

सदर आग बघून शेजारी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु आग प्रचंड असल्यामुळे ती विझवणे शक्य नव्हते. त्यामुळे अन्य शेजारील शेतकर्यांच्या उसाने पेट घेऊ नये यासाठी त्वरीत ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर वापरून उसाशी तोडल्यामुळे शेजारील शेतकर्यांचा ऊस वाचविण्यात यश आले. याकामी गणेश घाडगे, वैभव जाधव, सिद्धार्थ भिंगारदे, संजय खर्डे, सोमनाथ जाधव आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. जळालेला ऊस तोडणीसाठी मजुरांना ऊस बांधणीसाठी वाढे घेऊन द्यावे लागतात. तसेच अतिरिक्त पैसेही द्यावे लागतात व साखर कारखान्याकडूनही भाव कमी मिळून शेतकर्यांचे मोठे नुकसान होते. पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना खोबरे कुटुंबीय व ग्रामस्थांनी लवकरात लवकर पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.
