राहुरीमध्ये कत्तलीसाठी चालविलेल्या आठ गायींची सुटका दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना केले गजाआड
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे शनिवारी (ता.29) पोलिसांनी कारवाई करत कत्तलखान्यात चालविलेल्या आठ गायींची सुखरुप सुटका केली आहे. याप्रकरणी राहाता तालुक्यातील दोघांना गजाआड केले. तर सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मागील आठवड्यात शहरात 150 किलो गोमांस नेणारे वाहन पकडण्यात आले होते. आता ही दुसरी घटना घडल्याने तालुक्यात गोवंशाची हत्या होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मोहम्मद नूर कालू शेख (वय 30) व अमजद फकीर मोहम्मद शेख (वय 30, दोघे रा. ममदापूर, ता.राहाता) हे शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एक महिंद्रा कंपनीची पिकअपमध्ये (क्र.एमएच.12, जीटी.2230) आठ गोवंश जनावरांना क्रूर व निर्दयपणे कोंबून वाहतूक करीत होते. राहुरी पोलिसांना खबर मिळताच त्यांनी राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसाद नगर येथे ही पिकअप पकडून व दोघांना ताब्यात घेतले. यावेळी पिकअपमधील आठ जनावरांची सुखरुप सुटका करून त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले.
या कारवाईत 5 हजार रुपये किंमतीची पांढर्या रंगाची गावरान जातीची एक गाय, 15 हजार रुपये किंमतीच्या चार लहान-मोठ्या गावरान जातीच्या कालवडी, 30 हजार रुपये किंमतीच्या तीन काळ्या पांढर्या रंगाच्या जर्सी गायी तसेच 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची सफेद रंगाची एक महिंद्रा कंपनीची पिकअप असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी हवालदार सचिन ताजणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद शेख व अमजद शेख या दोघांवर राहुरी पोलिसांत गु.र.नं.431/2021 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विठ्ठल राठोड हे करीत आहे.