महाविकास आघाडी सरकारचे शेतकर्यांसाठी चांगले निर्णय ः थोरात चंदनापुरी येथे पाच गावांच्यावतीने नामदार थोरातांचा कृतज्ञता गौरव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकर्यांना तातडीने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली. नियमित कर्जफेड करणार्यांचे अनुदानही लवकरच दिले जाणार असून संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासकामांसाठी निधी दिला जात आहे. शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे समाजातील गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण सातत्याने काम करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा, आनंदवाडी, गणेशवाडी या गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी 59 कोटी रुपयांचा भरीव निधी दिल्याबद्दल या गावांच्यावतीने नामदार बाळासाहेब थोरात यांचा कृतज्ञता गौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधव कानवडे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत थोरात, महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, लक्ष्मण कुटे, दूध संघाचे माजी अध्यक्ष आर. बी. रहाणे, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, शांताराम कढणे, विजय रहाणे, सरपंच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, गणपत सांगळे, संतोष हासे, राजेंद्र चकोर, विलास कवडे, मारुती कवडे, सुरेश झावरे, रमेश गुंजाळ, संतोष मांडेकर, गोरख नवले यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले, राजकारण हे समाजातील शेवटच्या घटकाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी करावयाचे असते. संगमनेर तालुक्यात ही समृद्ध परंपरा जपली जात आहे. प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. निळवंडेसह विविध रस्त्यांची कामे ही अत्यंत वेगाने सुरू आहे. या सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी इंद्रजीत थोरात व इतर कार्यकर्त्यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. तालुक्यात विविध पाणी पुरवठा योजनांसाठी मोठा निधी मंजूर झाला असून यामुळे या गावांना शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले काम करत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक चांगल्या योजना राबवत आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसांचे आहे. जनतेचा मोठा विश्वास सरकारवर असून महाराष्ट्र विकासातून देशाला दिशादर्शक काम करत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी विक्रम थोरात, अनिल कढणे, एल. आर. रहाणे, कैलास सरोदे, बाबाजी सरोदे, रोहिदास रहाणे, के. बी. रहाणे, भाऊसाहेब कढणे, सोमनाथ काळे, विलास रहाणे, हर्षल रहाणे, किरण रहाणे, राजेंद्र रहाणे, साहेबराव सातपुते, किरण नवले, माधव वाळे, निखील पापडेजा, गौरव डोंगरे, ऋतिक राऊत, रमेश नेहे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, जीवन प्राधिकरणचे क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विलास कढणे यांनी केले. सूत्रसंचालन नंदकिशोर रहाणे यांनी केले तर रोहिदास रहाणे यांनी आभार मानले.