वैयक्तिक टीका टीपण्णी केल्यास जशास तसे उत्तर देऊ! राजूर येथे पत्रकारांशी बोलताना विरोधकांना दिले प्रत्युत्तर
नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यात आदिवासी विकास मंत्री म्हणून काम करत असताना आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी व आदिवासी समाज विकासासाठी स्वतंत्र बजेट, पेसा कायदा केला. त्यामुळेच अकोले तालुक्याचे जलाशय, वीज प्रकल्प, रस्ते मार्गी लागले. मात्र, चाळीस वर्षांत काय केले म्हणणार्यांनी आदिवासी विभागाचा पैसा दुसर्या विभागाला पगारासाठी वर्ग होत असताना झोपा काढता काय, असा सवाल उपस्थित केला. केवळ वैयक्तिक टीका टीपण्णी केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही माजी मंत्री मधुकर पिचड यांनी दिला.
राजूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गोवारी समाजाला आदिवासींमध्ये घेण्यासाठी आंदोलन झाले. मंत्रालयावर मोर्चा आला. शंभरपेक्षा अधिक गोवारी मृत्यूमुखी झाले. त्यावेळी शरदचंद्र पवार यांनी मंत्रालयात बैठक घेऊन चर्चा केली. गोवारींना आदिवासीत घेण्याचा आग्रह करतात. माझी भूमिका मांडताना झालेल्या घटनेचे मला दुःख झाले. मात्र, लाखो आदिवासींवर अन्याय होईल. त्यामुळे मी गृह विभागाची जबाबदारी असताना मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर सर्वोच्च न्यायालयाने गोवारी आदिवासी नाही म्हणून निकाल दिला. त्यामुळे केवळ तालुका नव्हे तर राज्यातील आदिवासींना न्याय देता आला, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी आदिवासी नाही म्हणून उच्च न्यायालयात विरोधकांनी दावा दाखल केला.
महादेव कोळी म्हणून न्यायालयाने मला न्याय दिला. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी समाजाचे विरोधक आज निवडणुका लढवू शकले. तालुक्यात राष्ट्रवादीचे पुढारी स्वस्त धान्य काळ्या बाजारात नेऊन विकतात. अकोले एज्युकेशन संस्थेबाबत वैयक्तिक टीपण्णी करून माझा बाप काढतात. माझा बाप तालुक्यातील जनता जनार्दन आहेत. तेच तुम्हांला उत्तर देतील, यापुढे वैयक्तिक टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही दिला. विकासाबाबत बोला, पिचड यांनी जितकी कामे केली, त्यापेक्षा अधिक विकास कामे करा. आदिवासी विकासाची ठक्कर बापा योजना बंद पडली, पडकाई योजना बंद, रस्ते नाहीत, आरोग्याचे तीन तेरा वाजले, पाण्याचं नियोजन नाही, एक बंधारा बांधला नाही. मी आदिवासींसाठी काम करून सामाजिक भूमिका पार पाडतो यापुढेही करेल, असे पिचड शेवटी म्हणाले.