अहमदनगर नव्हे, आता पूण्यश्‍लोक ‘अहिल्यानगर’ म्हणा! केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी; महायुतीने वचनपूर्ती केल्याचे मंत्री विखेंचे ट्विट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पूण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर राज्यशासनाने याबाबतचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवला होता. गेल्या महिन्यात रेल्वे मंत्रालयाने नामांतरणास हरकत नसल्याचे कळवल्यानंतर आता आज (ता.4) केंद्रीय मंत्रीमंडळाने राज्य शासनाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पूण्यश्‍लोक ‘अहिल्यानगर’ असे झाले आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंगवर याबाबतची माहिती देत महायुती सरकारने वचनूपर्ती केल्याची पोस्ट केली आहे.


अहिल्यादेवी होळकर यांच्या जिल्ह्यातील चोंडी येथील जन्मस्थळी गेल्यावर्षी आयोजित जयंती सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांचे भाषण सुरु असताना उपस्थितांमधून जिल्ह्याचे नामांतरण करुन पूण्यश्‍लोक अहिल्यानगर करावे अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्याची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्याच कार्यक्रमात जिल्ह्याचे नामकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारने नामांतराबाबतचा प्रस्तावही केंद्र सरकारला सादर केला. गेल्या वर्षभरापासून त्याला मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा असतानाच गेल्या महिन्यात रेल्वे मंत्रालयाने अहमदनगरच्या नामांतरणास कोणतीही हरकत नसल्याबाबत केंद्राला कळवले होते. त्याचवेळी जिल्ह्याचा नामांतणाचा विषय दृष्टीस पडू लागला होता.


केंद्रीय मंत्रीमंडळाने नामांतरणाला मंजुरी दिल्यानंतर आज (ता.4) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून महायुती सरकारने दिलेल्या वचनाची पूर्ती केल्याचे म्हंटले आहे. नामांतरासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे आभार मानले असून जिल्हावासियांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Visits: 124 Today: 3 Total: 112823

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *