महावितरणचा मोर्चा आता घरगुती थकबाकीदारांकडे अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार ग्राहकांची वीज तोडली

नायक वृत्तसेवा, नगर
शेतकर्‍यांकडील वीज बिलाच्या रकमेची थकबाकी मोठी आहे. मात्र, त्यासाठी कडक वसुली सूरू केल्यावर त्याचे वेगळे पडसाद उमटून राजकीय आंदोलने होत आहेत. त्यामुळे आता तीन महिने शेतकर्‍यांची वीज न तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम वसुलीवर होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने आता आपला मोर्चा घरगुती ग्राहकांच्या थकबाकी वसुलीकडे वळविला आहे. बिल न भरणार्‍यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असून अहमदनगर जिल्ह्यात अशा 4 हजार 980 थकबाकीदार ग्राहकांची वीज या महिन्यात तोडण्यात आली आहे.

महावितरणची केवळ कृषी पंपच नव्हे तर अन्य ग्राहकांकडेही मोठी थकबाकी आहे. त्यातील सरकारी आणि संस्थात्मक ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी अडचणी येत आहेत. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, पाणी पुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सेवा अशा ग्राहकांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. अहमदनगर जिल्ह्यात 2 लाख 70 हजार 803 ग्राहकांकडे 458 कोटी 2 लाख रुपये थकबाकी आहे. त्यातील घरगुती वीज वापरणार्‍या सुमारे 2 लाख 33 हजार ग्राहकांकडे 24 कोटी 27 लाख एवढी थकबाकी आहे. त्यासोबत पथदिवे 353 कोटी 85 लाख, पाणी पुरवठा योजनेतील 1 हजार 658 ग्राहकांकडे 64 कोटी 62 लाख अशी सरकारी आणि संस्थात्मक ग्राहकांकडेही थकबाकी आहे.

यासाठी महावितण कंपनीने आता कडक वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्याच एक भाग म्हणून सुमारे पाच हजार घरगुती ग्राहकांची वीज तोडण्यात आली. ज्यांनी पैसे भरले, त्यांचा वीज पुरवठा लगेच सुरळीत करण्यात आला. ही मोहीम सुरूच राहणार असल्याने ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 116934

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *