कोतूळ येथे पाणी बचाव कृती समितीचे आंदोलन पिंपळगाव खांड धरणातून पठाराला पाणी देण्यास विरोध

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून पाणी योजना करून संगमनेर तालुक्यातील पठारभागात पाणी नेण्याच्या वादावरून मंगळवारी (ता.17) कोतूळ येथे पाणी बचाव कृती समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

कोतूळ येथे मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करून याठिकाणी अनेकांनी पिंपळगाव खांड धरणातून पठारभागाला देण्याच्या या प्रयत्नाचा निषेध नोंदविला. विद्यमान आमदारांनी मुळा परिसरातील जनतेला विश्वासात न घेता पठारभागात पाणी देण्याचा होऊ घातलेला निर्णय चुकीचा आहे; हा निर्णय पिंपळगाव खांड धरणातील लाभधारकांवर अन्याय करणारा असल्याचे सांगत या आंदोलनात अनेक वक्त्यांनी आमदारांवर तोंडसुख घेतले.

पिंपळगाव खांड धरण माजी मंत्री मधुकर पिचड यांनी निर्माण केले आहे. आमदारांनी दुसरे धरण बांधावे, त्यातून पाणी पठाराला पाणी द्यावे त्याला आमचा विरोध नाही. पण आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नये. ज्यांना मुळा नदीच्या पाण्याची व भौगोलिक परिस्थितीची माहिती नाही असे लोक मुळा नदीवर पाणी अडविण्याची नवीन साईट पाहण्यासाठी स्टंटबाजी करतात असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख यांनी मीनानाथ पांडे यांचे नाव घेत टीका केली.

सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी. जे. देशमुख म्हणाले, की पठारभागाला पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रवरा नदीचा कालवा चंदनापुरी येथून जातो, यातून पिण्याचे पाणी देऊ शकता. अथवा मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून पठारभागाला पिण्याचे पाणी देणे शक्य आहे; हे असे असताना पिंपळगाव खांड धरणातून पाण्याचा आग्रह धरून या भागातील शेतकरी उध्वस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. या धरणातून पाणी दिल्यास लाखो रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या पाणी योजना मोडकळीस येतील आणि शेतकरी कर्जबाजारी होईल असे देशमुख यांनी सांगितले. पठारभागावरील लोकांच्या डोक्यावरचा हंडा जरूर उतरवा. मात्र पिंपळगाव खांड धरण व त्यावर वरील लाभधारक शेतकर्‍यांच्या डोक्यावर हंडा चढू देऊ नका असेही ते म्हणाले.

याप्रसंगी चासचे सरपंच बाळासाहेब शेळके, कोतूळचे राजेंद्र देशमुख, लहितचे अर्जुन गावडे, भाजपचे सोमदास पवार, बोरीचे संजय साबळे, सुदाम डोंगरे, सुभाष घुले, रोहिदास भोर, मनोज देशमुख, श्याम देशमुख, सचिन गिते, संपत पवार, दादापाटील शेटे आदिंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अगस्तिचे संचालक बाळासाहेब देशमुख, माजी संचालक सयाजीराव देशमुख, बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने, गंगाधर शेटे, दगडू हासे, कैलास डोंगरे, भाऊसाहेब देशमुख, रवींद्र आरोटे, चंद्रकांत घाटकर आदिंसह कोतूळ, भोळेवाडी, पांगरी, मोग्रस, लहित, चास पिंपळदरी, धामणगाव पाट परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Visits: 23 Today: 1 Total: 117929

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *