नेवाशाच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाईची टांगती तलवार अपहृत मुलीचा शोध न घेता कुटुंबियांना पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील एका गावातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न घेता पोलिसांनी त्रास दिला असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. याची दखल घेत भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे निरीक्षक पोवार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान, यासंदर्भात कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

नेवासा तालुक्यातील एका गावातून एका मुलीचे अपहरण करण्यात आले असून यासंदर्भात मुलीच्या आई-वडीलांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणात मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना त्रास दिला असल्याचा आरोप आहे. पोलीस ठाण्यात मुलीच्या तपासासंदर्भात चौकशी करण्यासाठी आले असता आम्हांला पोलिसांनी बंद खोलीत सकाळी 11 ते 3 या वेळेत अन्नपाण्याविना डांबून ठेवले. त्यानंतर सदर गुन्ह्यात आरोपीचा तपास करायचा सोडून आम्हांला अर्वाच्च भाषेत बोलले. तसेच 1 लाख 25 हजार रुपयांची मागणी केली. याशिवाय पैसे देखील देण्यात आले असल्याचे पीडित कुटुंबियांनी निवेदनात म्हटले आहे.

यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गोपीचंद पडळकर यांनी विनंती केली आहे की, अपहरण झालेल्या मुलीचा त्वरीत शोध घेऊन सुखरूप आई-वडीलांकडे सुपूर्द करावे तसे आदेश पोलिसांना द्यावेत. तसेच तत्काळ संबंधित पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. यामुळे निरीक्षक पोवार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असून अधीक्षक पाटील काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
