साखर संकुलावर उपोषण म्हणजे ‘अगस्ति’ची बदनामी ः गायकर सीताराम गायकरांनी पत्रकार परिषदेतून खोडले विरोधकांचे आरोप
नायक वृत्तसेवा, अकोले
पुणे येथील साखर संकुलावर दशरथ सावंत यांचे उपोषण म्हणजे अगस्ति कारखान्याची बदनामी करणारे आहे. मात्र, कारखान्याचा कारभार पारदर्शकच असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी ठणकावून सांगितले. याचबरोबर संचालक मंडळावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे, तथ्यहीन स्वरूपाचे असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
अगस्ति सहकारी साखर कारखाना येथे बुधवारी (ता.24) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक मीनानाथ पांडे, प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, बाळासाहेब देशमुख, रामनाथ वाकचौरे, गुलाब शेवाळे, महेश नवले, राजेंद्र डावरे, बाळासाहेब ताजणे, कचरु शेटे, सुनील दातीर, अशोक आरोटे, कार्यकारी संचालक अजित देशमुख, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष गायकर म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत. सोमवारी त्यांना मुंबईत भेटून स्पष्ट विचारले, दादा तुम्ही अगस्तिबाबत कोणाला शब्द दिला का? दिला असेल तर मी थांबतो. त्यावेळी ते म्हणाले, मी कोणालाही शब्द दिलेला नाही. उलट तुम्ही विचलित होऊ नका. तुम्ही व्यवस्थित अगस्ति कारखाना चालवावा असे सांगितले. तसेच कारखान्याच्या कारभाराची चौकशी चालू असून त्याचा अहवाल येऊ द्या. आम्ही दोषी असलो तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. कोणीही विषारी प्रचाराला बळी पडू नका असे आवाहन गायकर यांनी सभासदांना केले.
काही सभासद हे वर्षभर अगस्ति संदर्भात चर्चा, अफवा व गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे हंगाम चालू होतो की नाही? याबाबत सभासद, कामगारांमध्ये साशंकता होती. काही पार्ट पेमेंट बाकी होते. कर्मचार्यांचे पगार देणे बाकी होते. हे सर्व पेमेंट करण्यासाठी संचालक व काही विभाग प्रमुखांच्या नावावर 6 कोटी 11 लाख कर्ज काढले. जिल्हा बँकेकडून अल्प मुदत कर्ज मिळाल्यानंतर सर्व करार पूर्ण केले, असे असतानाही काही सभासदांनी संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. कर्जाविषयी चर्चा करून सभासदांमध्ये गैरसमज पसरून दिले. या कर्जासंदर्भात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने, वार्षिक सर्वसाधारण सभेतून विवेचन केलेले आहे. परंतु, सातत्याने त्यांची अडवणूक करणारी भूमिका आहे. याकडे गायकर यांनी आवर्जुन लक्ष वेधले.
शेतकरी संघटनेने शेतकर्यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव देण्यासाठी कर्ज काढावे, पण भाव द्यावा असा आग्रह धरला. कर्ज झाले तरी चालेल असे उलट म्हणतात. आम्ही कोणत्याही पक्षात असलो तरी त्यावेळी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला. आता पुन्हा सांगतो अजून कर्ज काढू परंतु तालुक्याची कामधेनू मोडू देणार नाही. कारण अगस्ति मोडला तर पुन्हा उभा राहणार नाही. सर्व सभासदांना एफआरपी प्रमाणे भाव देऊ, सर्वांचे पेमेंट करू, कामगारांचे थकीत वेतन देऊ त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करा असे आवाहन शेवटी गायकर यांनी केले.
जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी युरोप दौरा करून आले असा आरोप केला. त्याला संचालक गुलाब शेवाळे यांनी उत्तर दिले, आम्ही कोणाचे लाभार्थी नाही आणि आम्ही काही भिकारी नाहीत. आम्ही संचालक असलो म्हणून आम्ही आमच्या स्वखर्चाने कोठे जाऊ शकत नाही का? असा प्रतिसवाल करत आम्ही कारखान्याच्या खर्चाने गेलो असेल तर अमित भांगरे यांनी तसे सिद्ध करावे, असे जाहीर आव्हान दिले.