संगमनेर शहर पोलिसांनी दिली कधीनवद् कौतुक करण्याची संधी! चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश, दोघांना घेतले गोव्यातून ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्याच घराचा कडी-कोयंडा उचकटून जन्मदात्या आईच्या दागिन्यांसह तब्बल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरणार्‍या व मित्राच्या मदतीने नाशिकमध्ये ते विकणार्‍या दोघांना अखेर शहर पोलिसांनी थेट गोव्यातील समुद्र किनार्‍यावरुन ताब्यात घेतले आहे. आपल्याच आईचे दागीने चोरुन त्यावर एैश करु पाहणार्‍या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. शहर पोलिसांनी अवघ्या नऊ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून बहुतेक मुद्देमाल हस्तगत केल्याने मोठ्या कालावधीनंतर एखादातरी ‘शोध’ पूर्ण करणार्‍या शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.

गेल्या 20 ऑक्टोबर रोजी मालदाड रोड परिसरात असलेल्या विद्युत वसाहतीत राहणार्‍या संजय डमरे यांच्या पोटच्या मुलाने आपल्याच घराचा दरवाजा उचकाटून आपल्या जन्मदात्या आईचे 2 लाख 82 हजार 500 रुपये किंमतीचे दहा ताळ्यांचे दागिने, 25 हजार रुपये किंमतीची होन्डा कंपनीची दुचाकी (क्र.एम.एच.15/बी.बी.5701) व पाच हजार रुपये किंमतीची पॉवर बँक आणि तीन घड्याळे असा एकूण 3 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा केला होता.

आपल्याच घरातून चोरलेले दागिने व अन्य मुद्देमाल विक्री करण्यासाठी संबंधिताने आपला मित्र व त्याच्या पत्नीची मदत घेतली व नाशिकमध्ये त्यातील काही ऐवज विकल्याचा आरोप करीत आरोपीची आई मंगल संजय डमरे यांनी 21 ऑक्टोबररोजी शहर पोलीस ठाण्यात आपला मुलगा आतिष, त्याचा मित्र सुरज वाघ आहण त्याची पत्नी निकिता वाघ अशा तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी या तिघांविरोधात भा.द.वी..च्या कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास सहाय्यक निरीक्षक राणा परदेशी यांच्याकडे सोपविला.
सदर प्रकरणातील बारकावे लक्षात घेवून पो.स.ई.परदेशी यांनी मोबाईल लोकेशनवरुन आरोपीचा माग काढीत त्याचा पाठलाग सुरु केला. आरोपींनी फिरत फिरत थेट गोवा गाठले व तेथे त्यांची मजा सुरु होती. अधुनमधून त्यांचे फोन बंद होत असल्याने पोलीस अंधातरीत असत, मात्र एखादा फोन करण्यासाठी त्यांनी फोन सुरु केला की पोलिसांना दिशा मिळत. असे करीत करीत अखेर पोलीस गोव्यात पोहोचले. दोन दिवस तेथे कसून तपास केल्यानंतर अखेर आतिष डमरे आणि त्याचा जोडीदार सुरज वाघ हे दोघेही गोव्यातील समुद्र किनार्‍यावरील प्रसिद्ध कलिंगुड बीचवर असल्याचे पोलिसांना समजले. गोवा पोलिसांच्या मदतीने बीचवरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

संबंधित आरोपी आणि पोलीस पथक अद्याप संगमनेरात पोहोचलेले नसून त्या दोघांनी चोरलेला ऐवज कोठे कोठे विकला याचा तपास करीतच पोलीस परतीचा प्रवास करीत आहेत. दैनिक नायकला मिळालेल्या माहितीनुसार चोरलेल्या एकूण मुद्देमालापैकी जवळपास ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, मात्र नेमका किती ऐवज हाती लागला याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.


गेल्या काही वर्षांपासून संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्याची अक्षरशः रया गेली आहे. केवळ गुन्हे दाखल करण्याचे ठिकाण अशी ओळख निर्माण झालेल्या शहर व तालुका पोलीस ठाण्यात तपासाच्या नावाने ठणठणपाळ आहे. यापूर्वी येथे घडलेल्या काही मोठ्या गुन्ह्यांचे तपासही नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केल्याने त्याचे संपूर्ण श्रेय पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या टीमला जाते. तपासाच्या नावाने शून्य असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून मोठ्या कालावधीनंतर ‘तपास’ लागल्याची सुवार्ता समोर आल्याने कधीनवद् अभिनंदन करण्याची संधी दिल्याबद्दल संगमनेरकरांमधून शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.

Visits: 99 Today: 1 Total: 1105802

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *