फर्निचर मॉल फोडून लाखोंचा ऐवज लंपास! समनापूरातील घटना; तेरा दूरचित्रवाणी संच लांबविले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या एकामागून एक घटना घडण्याचा सिलसिला सुरुच असून चोरट्यांनी आता महागड्या वस्तूंची मोठी दुकाने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. असाच प्रकार शुक्रवारी पहाटे समनापूर गणपती मंदिराजवळील भिंगारे फर्निचर मॉलमध्ये घडला असून चोरट्यांनी दुकानाचा पत्रा कापून आत ठेवलेले विविध कंपन्यांचे 1 लाख 33 हजार रुपये किंमतीचे दूरचित्रवाणी संच (टी.व्ही) लांबविले आहे. या घटनेने शहरालगत अलिशान मॉल टाकणार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास लावण्याची मागणी होत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरातील प्रतिथयश व्यापारी विष्णू यादव भिंगारे यांचे समनापूर शिवारातील गणपती मंदिराजवळ फर्निचरसह इलेक्टॉनिक वस्तूंचे मोठे दुकान (मॉल) आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री दुकानातील कामकाज आटोपून दुकानाला कुलपे लावून ते घरी गेले. काल शुक्रवारी (ता.13) सकाळी दुकान उघडण्यासाठी ते गेले असता पाठीमागील बाजूचा पत्रा कोणीतरी कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानात जावून त्यांनी परिस्थितीची पाहणी केली असता चोरी झाल्याचे त्यांना दिसले. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा पत्रा कापून दुकानात ठेवलेले एल.जी.कंपनीचे 32 इंची चार, पी.एच.एक्स. कंपनीचे 32 इंची चार, एम.आ.कंपनीचे 32 इंची चार व आयटेल कंपनीचे 32 इंची दोन असे एकूण 1 लाख 33 हजार रुपये किंमतीचे 13 दूरचित्रवाणी संच चोरुन नेल्याचे आढळून आल्यानंतर याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भा.दं.वि. कलम 461, 380 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडे देण्यात आला आहे. सदरची घटना समजताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. याबाबत आसपासचे सीसीटीव्ही फूटेज मिळवून त्याद्वारे या प्रकरणाचा शोध लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्यांचे प्रमाण वाढू लागले आहेत. मात्र प्रत्येक घटनेनंतर केवळ पोलीस दप्तरी त्याची नोंद होत असून प्रकरणांचे तपास तडीस नेण्यात शह पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सामान्य व्यापार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांविषयी त्यांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी अशा घटनांच्या तपासाची गरज आहे, मात्र शहर पोलीस वारंवार तेथेच कमी पडत आहेत. या घटनेचा पोलिसांनी लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणीही व्यापार्यांनी केली आहे.