जयहिंद लोकचळवळीत सर्वांनी एकत्र या ः आ. डॉ. तांबे जयहिंद पत्रिकेचा रविवारी प्रकाशन सोहळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुदृढ व निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोकचळवळीच्यावतीने जयहिंद पत्रिकेच्या आवृत्तीचा ऑनलाइन प्रकाशन सोहळा रविवारी (ता.15) संपन्न होणार आहे. ही लोकचळवळ सर्व प्रवासातील स्त्री-पुरुषांना संघटित करणारी आहे. चांगल्या समाज निर्मितीकरीता सर्वांनी जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून एकत्र या, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

याबाबत अधिक बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, जयहिंद लोकचळवळ ही एक सेवाभावी संस्था असून सुदृढ व निरोगी समाज निर्मितीची मोठी लोकचळवळ आहे. यामध्ये सर्व प्रवाहातील स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन चांगल्या समाज निर्मितीचे स्वप्न घेऊन काम करायचे आहे. आपली लोकशाही ही समाजाच्या हिताची आहे. त्या मार्गाने काम करण्यासाठी युवावर्ग, समाजातील सर्व घटक यांना एकत्र करून लोकशाहीची मूल्ये जपत निरोगी समाज निर्मितीचे कार्य करायचे आहे.

जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून मागील 22 वर्षांत सांस्कृतिक युवा क्रीडा स्पर्धांसह, पर्यावरण, आरोग्य, संस्कार, विज्ञानवादी दृष्टीकोन, स्वच्छता अभियान, नोकरी मेळावे यावर काम केले जात आहे. मागील दोन वर्षांपासून ग्लोबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगातील 28 देशांमध्ये या चळवळीचे काम पोहोचले आहे. आता नव्या रूपात ऑनलाइन पद्धतीनेही यामध्ये सहभागी होता येत आहे. जयहिंदच्या विविध माहितीची पुस्तिका असलेल्या जयहिंद पत्रिकेच्या पहिल्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी 6 वाजता ऑनलाइन पद्धतीने संपन्न होणार आहे. यावेळी जयहिंदचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात, दुर्गा तांबे, सत्यजीत तांबे हेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तरी समाजाच्या शाश्वत प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येवून जयहिंद लोकचळवळीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे व जयहिंद लोकचळवळीच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 119240

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *