भेंडा खुर्द येथे घरफोडी; 55 हजारांचा ऐवज लंपास नेवासा पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल; नागरिकांत भीती

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील भेंडा खुर्द येथील अंगणवाडी सेविका रंजना उत्तम खरात यांच्या राहत्या घराचा बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता.11) रात्री घडली आहे. याबाबत नेवासा पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अंगणवाडी सेविका रंजना खरात त्यांच्या बहिणीकडे नेवासा फाटा येथे गेल्या असता पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी सायंकाळी 5 ते 12 मे रोजी सकाळी 6 या दरम्यान त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करुन मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. यामध्ये 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, सॅमसंग कंपनीचा 15 हजार रुपये किंमतीचा 42 इंची एलईडी टीव्ही, 20 हजार रुपये रोख रक्कम व 5 हजार रुपये किंमतीचा पॅनासॉनिक कंपनीचा मोबाईल असा एकूण 55 ते 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

या प्रकरणी अंगणवाडी सेविका रंजना खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कुकाणा दूरक्षेत्र पोलिसांना चोरीच्या घटनेचा तपास लावण्याचा आदेश दिला असून नगर येथील पोलीस पथकानेही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. लवकरच चोरट्यांना जेरबंद करु असा विश्वास तपासी हवालदार बाबासाहेब कोळपे यांनी व्यक्त केला आहे.

Visits: 189 Today: 1 Total: 1950535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *