श्रीरामपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की शहर पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अपहृत मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी पोलीस तपासाबाबत जाब विचारला. यावेळी तपासी अधिकारी उपनिरीक्षक समाधान सूरवाडे व नातेवाइकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संबंधित मुलीच्या नातेवाइकांनी उपनिरीक्षक सूरवाडे यांना धक्काबुक्की करीत जखमी केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा 13 फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांत नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास सूरवाडे यांच्याकडे होता. या मुलीच्या शोधासाठी सूरवाडे पोलीस नाईक किरण पवार, हवालदार तुषार गायकवाड यांच्यासह 10 मे रोजी पुण्याला गेले होते. तेथून संबंधित मुलगी शिर्डी येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी अपहृत मुलीचा शिर्डी परिसरात शोध घेतला. साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक चारजवळ तिच्या वडिलांना ती सापडली. तिला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणले.

गुरुवारी (ता. 12) दुपारी बाराच्या सुमारास सदर गुन्ह्यातील अपहृत मुलीचा जबाब नोंदवत असताना वीज पुरवठा खंडित झाला. यावेळी मुलीचे नातेवाईक कक्षामध्ये आले. त्यातील एकाने, मुलीची वैद्यकीय तपासणी का करत नाही, असा सवाल केला. त्यानंतर नातेवाईक व सूरवाडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर तिघांनी मिळून सूरवाडे यांना मारहाण करीत जखमी केले. यावेळी पोलीस ठाण्यात व कक्षामधील नेमणुकीस असलेले अंमलदार सोमनाथ गाडेकर, पोलीस शिपाई भारत तमनर, महिला पोलीस शिपाई योगिता निकम, सरग, ठाणे अंमलदार आलम पटेल, हवालदार पोपट भोईटे, नागरिक सुनील मुथ्था व सुभाष जंगले यांनी मध्यस्थी करत सूरवाडे यांची सुटका केली. यात गाडेकर यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी सूरवाडे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *