पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला आदिम जमाती बांधवांशी संवाद जिल्हाभरातील लहान-मोठ्या सुमारे २१४ जणांनी नोंदवला सहभाग

नायक वृत्तसेवा, राजूर
देशातील १८ राज्यांतील आदिम जमातीच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने व अभियानाचा आढावा घेण्याच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यसंवाद आयोजित करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील या जमातींच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी राजूर (ता.अकोले) येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयातही या संवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कधीही समूहाने एकत्र न येणारा जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या सुमारे ८८ कुटुंबातील लहान-मोठ्या अशा सुमारे २१४ जणांनी आपला सहभाग यात नोंदवला. यात बहुतांशी अकोले तालुक्यातील नागरिक आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, संगमनेर भागाचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, माजी मंत्री मधुकर पिचड, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, प्रकल्प अधिकारी राजन पाटील, अकोल्याचे तहसीलदार सतीष थेटे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे व जिल्ह्यातील इतर विभागांचे अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आधारकार्ड, जातीचा दाखला, रेशनकार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे या समाजातील बहुतांशी कुटुंबांकडे नसल्यामुळे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही हा समाज शासकीय योजनांपासून कोसो दूर होता. पंच्याहत्तरी नंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे महाभियान सुरू केले. या अभियानामुळे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील, तालुक्यातील वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी या समाजाला विविध योजना मिळवण्याच्या दृष्टीने लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी राबत होती. याचाच परिपाक म्हणून या समाजातील बहुतांशी कुटुंबांना आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, आयुष्मान भारत कार्ड मिळाले. तर शबरी घरकुल योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठीचा निधी जनधन खात्यात वर्ग करण्यात आला. प्रातिनिधीक स्वरूपात या समाजातील काहींना जिल्हाधिकारी सालीमठ व इतर मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत कार्ड, महावितरण वीज पुरवठा परवाना, जातीचा दाखला, आधारकार्ड आदी वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन नवनाथ गायकवाड यांनी तर आभार प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी मानले.
