‘तीनबत्ती हल्ला’ प्रकरणी चिथावणीखोर पोलिसांच्या ताब्यात! रविवारी पहाटे अटक केलेल्या नऊ जणांसह दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

गेल्या 6 मे रोजी तीनबत्ती चौकात कर्तव्य बजावणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर मुस्लिम समुदायातील काहींनी हल्ला चढवला होता. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज प्राप्त करुन त्याआधारे जवळपास 35 जणांची ओळख पटविली आहे. हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी (ता.7) त्यातील चार जणांना गजाआड केल्यानंतर रविवारी (ता.16) पहाटे आणखी नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांचा शोध घेतांना रविवारी रात्री पोलिसांना आणखी एक चिथावणीखोर सापडला असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या आता 14 झाली आहे. या प्रकरणात निष्पन्न झालेले 21 आरोपी अजूनही पसार असून शहर पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.

मागील पंधरवड्यातील गुरुवारी (ता.6) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संगमनेर शहरातील मोगलपूरा भागात मोठी गर्दी जमल्याने अहमदनगरहून बंदोबस्तासाठी आलेल्या आणि गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने गर्दीला हटकले. मात्र तरीही काहीजण पोलिसांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी काहींना काठीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येवून काहींनी जमलेल्या जमावाला चिथावणी दिली, त्याचा परिणाम जमावातील काहींनी पोलिसांसह त्यांच्या वाहनावर तुफान दगडफेक करायला सुरुवात केली. पोलीस बळ कमी आणि जमावाची संख्या मोठी असल्याने प्रसंगावधान राखून पोलिसांनी मोगलपूर्‍यातून माघार घेत तीनबत्ती चौकाकडे जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र यादरम्यान कमल पेट्रोल पंपासमोरील मोगलपूर्‍याच्या बोळापासून ते तीनबत्ती चौकापर्यंतच्या तीनशे ते चारशे मीटर अंतरात पायी चालणार्‍या पो.कॉ.सलमान शेख, प्रशांत केदार व भगीरथ देशमाने या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. तीनबत्ती चौकात तर जमावाने सलमान शेख या पोलीस कर्मचार्‍यास घोळक्यात घेवून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा कावा लक्षात आल्यानंतर शेख यांनी तेथून स्वतःला बाजू केल्याने एकप्रकारे त्यांचा जीव वाचला. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण होवून राज्यभर त्याचे पडसाद उमटले. घटनेच्या दिवशी रात्री पोलिसांनी वरील परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून आरोपींची ओळख पटविण्यास सुरुवात केली.

त्यातून सुरुवातीला मुसेब अल्लाउद्दिन शेख (वय 31, रा.अपनानगर), आसिफ मेहबुब पठाण (वय 31, रा.मोगलपूरा), सय्यद युनुस मन्सूर (वय 24, रा.गवंडीपूरा) व मोसीन इमाम शेख (वय 35, रा.जम्मनपूरा) या चार आरोपींना गेल्या शुक्रवारी (ता.7) अटक केली. एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्या चौघांचीही जामीनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘अटकसत्र’ स्थगीत केल्याने जवळपास आठवडाभर ‘तीनबत्ती’ प्रकरण मागे पडले होते. मात्र शुक्रवारी (ता.14) रमजान ईद साजरी होताच, शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी पुन्हा एकदा तीनबत्ती प्रकरणाची फाईल उघडीत मोगलपूरा, लखमीपूरा, सय्यदबाबा चौक, नायकवाडपूरा, जोर्वेनाका, भारतनगर अशा मुस्लिम बहुल विभागांना वेढा घालीत सरसकट घरझडती घेतली.

रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु असलेल्या या ‘कोम्बिंग’ ऑपरेशनमधून निष्पन्न 35 आरोपींमधील शिल्लक 31 पैकी नऊ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यात रिझवान मोहंमदखान चौधरी (वय 31, रा.अपनानगर), इर्शाद अब्दुल जमीर (वय 37) व अरबाज अजीम बेपारी (वय 20, दोघेही रा.भारतनगर), सय्यद जोयेबअली शौकत सय्यद (वय 27, रा.तीनबत्ती), अर्शद जावेद कुरेशी (वय 18) व शफीक इजाज शेख (वय 24, दोघेही रा.लखमीपूरा), मोहंमद मुस्ताफ फारुक कुरेशी (वय 35) व फारुक बुर्‍हाण शेख (वय 45, दोघेही रा.मोगलपूरा) या नऊ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. रविवारी (ता.16) त्यांना संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यां समोर उभे केले असता त्यासर्वांना मंगळवारपर्यंत (ता.18) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

रविवारी पहाटे पोलिसांनी मुस्लिम बहुलभागात छापासत्र अवलंबून धरपकड सुरु केल्याने गेल्या पंधरवड्यापूर्वी वाघ होवून पोलिसांवर धावून गेलेल्या जमावातील आरोपी शेळ्या होवून पसार झाले आहेत. आज पहाटेही पोलिसांनी संशयीतांच्या शोधासाठी काही ठिकाणी छापे घातले. त्यातून ‘त्या’ घटनेच्यावेळी जमावाला चिथावणी देवून हल्ला करण्यास सांगणारा व मूळचा मालेगाव येथील असलेला मात्र सध्या संगमनेरातील कुरणरोडवरील मोगल टेकडीवर स्थिरस्थावर झालेल्या मोहंमद कासिम पापा शेख (वय 25) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता, त्यालाही दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ‘तीनबत्ती’ प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता चौदा झाली आहे.

मागील पंधरवड्यात 6 मे रोजी तीनबत्ती चौकात कर्तव्यावरील पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यासह राज्यातूनही संताप व्यक्त झाला होता. याप्रकरणात सुरुवातीला चार आरोपींना गजाआड केल्यानंतर रमजान ईद तोंडावर असल्याने पोलिसांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून ‘धरपकड’ थांबविली होती. मात्र शुक्रवारी ईद साजरी होताच या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांचा पुन्हा शोध सुरु झाला असून गेल्या 24 तासांत चिथावणीखोरासह दहा जणांना गजाआड करण्यात आले आहे. त्यामुळे हल्ल्याच्यावेळी जमावात असलेल्यांनी पसार होत अन्यत्र आश्रय घेण्यास सुरुवात केली असून पोलिसांना आरोपींची नावे निष्पन्न झालेली असल्याने पसार झालेल्यांचा माग काढला जात आहे.

पोलीस कर्मचार्‍यांवरील हल्ला प्रकरण आम्ही अतिशय गांभिर्याने घेतले असून असे प्रकार कदापीही खपवून घेतले जाणार नाहीत. गेल्या काही दिवसांत शहर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्यांची संपूर्ण माहिती संकलित केली असून उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फूटेज व व्हिडिओ चित्रणावरुन हल्ल्यात सहभागी प्रत्येकाची ओळख पटविली जात आहे. आत्तापर्यंत आम्ही चौदा जणांना अटक केली असून त्यातील चौघांची जामीनावर सुटका झाली आहे. या प्रकरणातील शेवटचा आरोपी गजाआड होईस्तोवर पोलिसांची कारवाई सुरुच राहणार असून कोणालाही सोडले जाणार नाही.

राहुल मदने – पोलीस उपअधीक्षक, संगमनेर

Visits: 138 Today: 1 Total: 1104685

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *