बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा भक्तांनी शिर्डीत केला निषेध नगर-मनमाड महामार्गावर साईबाबांची आरती करुन निषेधाचा दिला नारा


नायक वृत्तसेवा, शिर्डी
बागेश्वर धामप्रमुख बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. एवढेच नव्हेतर त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणार्‍या व प्रसिद्धीच्या खटाटोपापायी टीकेचे लक्ष्य होत स्वतःला हिंदुत्ववादी राष्ट्रीय संत म्हणविणार्‍या बागेश्वर बालाजी धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर शिर्डीसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने नगर-मनमाड महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत साईनामाचा जयघोष करीत श्री साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर आरती करुन धीरेंद्र शास्त्रींचा निषेध केला. त्यानंतर मंदिराच्या चौथ्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारापर्यंत पायी जात हाती निषेधाचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ग्रामस्थांनी सांगितले, की खोट्या प्रसिद्धीसाठी धीरेंद्र हा तथाकथित महाराज इतर महान संतांबाबत चुकीचे वक्तव्य करत असतात यांना वेळीच चाप लावणे गरजेचे झाले आहे. माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, नितीन उत्तम कोते, विकास गोंदकर, अभिजीत कोते, नितीन अशोक कोते, किरण कोते आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, जगाला श्रद्धा सबुरीचा संदेश देणार्‍या साईबाबांनी सबका मालिक एक हा सुद्धा मंत्र दिला आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. बाबांचे आचार विचार, शिकवणूक व संदेश मानव धर्माच्या हिताचा आहे. बाबांनी आजपर्यंत केलेल्या चमत्कारांची व दिलेल्या साक्षात्कारांची अनुभूती अनेक भक्तांना आलेली आहे. त्यामुळे साईबाबा हे प्रत्येक भाविकासाठी देवच आहेत. बागेश्वर बालाजी धामचे धीरेंद्र स्वामी यांनी साईबाबांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा फक्त शिर्डीतच नव्हे तर देशभरातून निषेध होत आहे.


शिर्डीचे साईबाबा हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी बाबांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल माफी मागावी. अन्यथा देशातील साईबाबांचे भक्त त्यांच्या विरोधात लवकरच निषेध मोर्चा काढतील.
– नितीन कोते (साईभक्त, शिर्डी)

Visits: 106 Today: 1 Total: 1106329

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *