धानोरे ग्रामस्थांचे अनोखे उपोषण दुसर्या दिवशीही सुरूच!
धानोरे ग्रामस्थांचे अनोखे उपोषण दुसर्या दिवशीही सुरूच!
प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने तीव्र नाराजी; अवैध उत्खननावर कारवाईची मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
सध्या वाळूतस्करी, अवैध मुरुम उत्खनन आदी अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. यावर पोलीस व महसूल प्रशासन कडक कारवाई करताना दिसून येतात. परंतु तरी देखील अवैध व्यावसायिकांवर जरब बसताना मात्र दिसत नाही. प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या रोज हजारो ब्रास मुरूम उचलला जात आहे. यावर कारवाई करावी करत आळा घालावा यासाठी परिसरातील ग्रामस्थ नेहमीच आक्रमक होताना दिसतात. परंतु महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून राहुरी तालुक्यातील धानोरे ग्रामस्थांनी अनोखे उपोषण केले आहे. ‘हे राम’ म्हणत स्मशानभूमीतच सरण रचून त्यावर बसून उपोषण सुरू केले. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून याकडे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली असल्याने उपोषणकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवरा नदीपात्रातून गेल्या काही वर्षांपासून खुलेआम अनधिकृत वाळू आणि मुरूम उपसा होत असताना महसूल प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने धानोरे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान दिघे आणि आदिनाथ दिघे यांनी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी ‘हे राम’ म्हणत स्मशानात लाकडे व सरपण रचून त्यावरच आमरण उपोषण सुरू केले आहे. दोषी अधिकारी व वाळू तस्करांना पाठिशी घालण्याचे काम महसूलचे अधिकारी करीत असल्याने आम्ही न्यायासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत दोषींवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, नुकतेच देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरातून अवैधरित्या रोज हजारो ब्रास मुरूम उचलला जात आहे. या मुरूममाफियांवर येत्या आठ दिवसांत कारवाई करा. अन्यथा राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देवळाली प्रवरा शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी निवेदनाद्वारे दिला होता. तर आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही अद्यापही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नसल्याने जोपर्यंत या वाळू आणि मुरूमचोरी प्रकरणातील दोषी महसूलच्या अधिकारी व कर्मचार्यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत स्मशानातील बेमुदत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.