तरुणीच्या विनयभंग प्रकरणी युवती सेनेचे प्रशासनास निवेदन कठोर कारवाईची मागणी; विद्यार्थिनींमध्ये पसरले दहशतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील बोरावके महाविद्यालयात मुलीचा विनयभंग व मारहाणीचा घडलेला प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे मुलींमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासन व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन नुकतेच युवती सेनेच्या जिल्हाध्यक्षा नेहा कोकणे यांनी पोलीस व महाविद्यालय प्रशासनास दिले.

सदर निवेदनात म्हटले की, महाविद्यालयात शहरासोबतच ग्रामीण भागातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. महाविद्यालयाचा नावलौकिक चांगला असल्याने पालकही मोठ्या विश्वासाने महाविद्यालय प्रशासनाच्या भरवशावर विद्यार्थिनींना एकटे पाठवितात. मात्र अलिकडील काळात दिवसेंदिवस गैरप्रकार वाढत चालले असून त्यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकास काळीमा फासतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वारंवार घडणार्या या प्रकारामुळे गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांवर महाविद्यालय प्रशासनाचा कुठलाही धाक दिसून येत नाही, असे दिसते. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी गुंड प्रवृत्तीच्या मुलांना घाबरून जाऊ नये. आपण विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी कायम त्यांच्या मागे उभे राहू, अशी ग्वाही कोकणे यांनी यावेळी देऊन या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण करावे, अशी मागणी केली. यावेळी युवा सेनेच्यावतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक संजय सानप, बोरावके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष नीरज नागरे, शहर प्रमुख किरण लबडे, शाखा प्रमुख शिवा पानसरे, महाविद्यालय कक्षप्रमुख प्रतीक यादव, शंकर लबडे आदी उपस्थित होते.
