भर उन्हाळ्यात अमृतवाहिनी प्रवरा महिनाभर वाहती राहणार! संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिका, पोलीस व नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या आठवडाभराच्या अंतरातच पुन्हा एकदा भंडारदरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने भर उन्हाळ्यात तब्बल महिनाभर अमृतवाहिनी वाहती राहणार आहे. सदरचे आवर्तन सिंचनाच्या उद्देशाने सोडण्यात आल्याने ते प्रदीर्घ कालावधीपर्यंत सुरु राहणार असून संगमनेर-अकोलेकरांना प्रचंड उष्णतेत गारवा मिळणार आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे या दोन्ही तालुक्यातील नदीचे पात्र अतिशय धोकादायक आणि जीवघेणे बनले आहे. जागोजागी प्रचंड खड्डे निर्माण झाल्याने मागील काही वर्षात उन्हाळी आवर्तनात अनेक दुर्घटना घडून त्यातून निष्पापांना आपले जीव गमवावे लागले आहेत. संगमनेरातही मागील मोठ्या कालावधीपासून अशा दुर्दैवी घटना घडल्या असून उन्हाळी आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, पालिका व नागरीकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

अपेक्षेप्रमाणे कालवा सल्लागार समितीच्या पूर्वनियोजनानुसार भंडारदरा-निळवंडे धरणातून सिंचनासाठीचे प्रदीर्घ आवर्तन सोडण्यात आले. आज (ता.10) सकाळी सहा वाजता निळवंडे धरणाच्या मोरीतून 1 हजार 400 क्युसेक वेगाने पाणी सोेडण्यात आले असून बुधवारी सायंकाळपर्यंत ते संगमनेरात पोहोचण्याची शक्यता आहे. आज सकाळी पाणी सोडतांना 11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात 4 हजार 978 दशलक्ष घनफूट तर 8 हजार 320 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या निळवंडे धरणात 4 हजार 316 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. चालू उन्हाळी आवर्तनात त्यातील तीन ते साडेतीन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे.

सध्या शालेय सुट्ट्या असल्याने बच्चे कंपनी मोकळी आहे, त्यातच मामाच्या गावी आलेल्यांचीही त्यात भर पडल्याने लहान मुलांची सर्वत्र धम्माल सुरु आहे. उन्हाळ्याच्या हंगामात उभी पिकं करपू नयेत यासाठी आवर्तनाचे नियोजन करताना उन्हाळी हंगामात लाभक्षेत्रासाठी तीन आवर्तने देण्याचे नियोजन केले जाते. यातील एप्रिल व मे महिन्यातील आवर्तन संगमनेरकरांसह येथे आलेल्या पाहुण्यांसाठी आनंद देणारी पर्वणीच ठरते. प्रचंड उष्णतेच्या या कालावधीत संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रात सकाळपासूनच अबालवृद्धांची आंघोळीसाठी मोठी गर्दी होत असते. सायंकाळच्या वेळेस या परिसराला तर अक्षरशः जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. विविध खाद्यान्नाची दुकाने, खेळणी, फुगे यामुळे उन्हाळी आवर्तनाच्या कालावधीत संगमनेरचा नदीकाठ लहान मुले, महिला व माणसांनी अगदी गजबजून गेलेला असतो.

मात्र, मागील काही वर्षांपासून दरवर्षी उन्हाळी आवर्तनात या आनंद पर्वाला वेदनेची किनार लावणार्या दुर्दैवी घटनाही समोर येत आहेत. गेल्या दशकभरापासून शेकडों वाळुतस्करांकडून दिवसरात्र अमृतवाहिनीचे लचके तोडले जात असल्याने संगमनेर तालुक्यातील संपूर्ण नदीपात्रच अतिशय धोकादायक बनले आहे. जागोजागी निर्माण झालेले प्रचंड खड्डे दरवर्षी कोणाचातरी बळी घेतात, आणि संगमनेरकरांच्या आनंदावर त्यामुळे विरजन पडते. त्यामुळे नदीकाठी जाण्याआधी विशेषतः अंघोळीसाठी नदीपात्रात उतरणार्यांनी अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. नदीपात्र एकसारखे व नियमित नसल्याने लहान मुलांसह पोहता न येणार्यांनी थेट नदीपात्रात उतरणेच टाळायला हवे इतकी वाईट अवस्था सध्याची आहे. नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबियांची स्वयंकाळजी घेतल्यास अशाप्रकारच्या दुर्दैवी घटनांना पायबंद घातला जाईल, मात्र उत्साहापुढे सुरक्षा तोकडी पडत असल्याने गेल्याकाही वर्षात अशा घटनांमध्ये सातत्य कायम आहे.

संगमनेरात फिरायला जाण्यासाठी अथवा विरंगुळ्यासाठी नदीपात्र वगळता अन्य ठिकाणं नसल्याने उन्हाळी आवर्तनाच्या कालावधीत दुपारी चारपासूनच साईबाबा मंदिर ते गंगामाई घाटापर्यंत संगमनेरकर मोठी गर्दी करतात. यामध्ये विशेष करुन महिला, मुली व लहान मुलांची संख्या अधिक असल्याने या गर्दीत विकृतांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांच्याकडून महिलांची छेडछाड, मनाई असतानाही गंगामाईच्या परिसरातून दुचाक्या घुसवून गर्दीतून वेगाने त्या चालविण्याचे प्रकार घडत असतात. त्यातून यापूर्वी या भागात जातीय तणावासारखे प्रकारही घडले आहेत. अशा एखाद्या किरकोळ घटनेतून संगमनेरचे सामाजिक स्वास्थ बिघडले जावू नये यासाठी पालिकेसह पोलिसांनीही आपली जबाबदारी चोखपणे पाळण्याची गरज आहे. आवर्तनाच्या कालावधीत या परिसरात महिला पोलिसांसह बंदोबस्त असायलाच हवा अशी नागरीकांची अपेक्षा आहे. संभाव्य दुर्घटना आणि छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनीही त्यादृष्टीने तो देण्याची गरज आहे.

कधीकाळी जातीय तणावाचे केंद्र राहीलेल्या संगमनेरात मागील तीन दशकांत जातीय हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्यास एखादी छोटी घटनाही शहराला तणावाच्या दारात नेवून उभी करते असे प्रसंग या कालावधीत वारंवार समोर आले आहेत. उन्हाळी आवर्तनाच्या कालावधीत नदीकाठावर महिलांच्या छेडछेडीचे असंख्य प्रकार घडत असतात, त्यातून यापूर्वी जातीय तणावाच्या घटनाही घडल्या आहेत. संगमनेरातील सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी या घटनाक्रमाचा गांभीर्याने विचार करुन आवर्तनाच्या संपूर्ण कालावधीत नदीकाठावर आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे.

