आजी-माजी बंडखोरांमध्ये रंगणार शिर्डी लोकसभेची निवडणूक! 2014 सालची पुनरावृत्ती; उत्कर्षा रुपवतेंसह वंचितच्या भूमिकेने रंगत वाढणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागा वाटपावरुन राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत द्वंद्व रंगलेले असतानाच शिवसेनेच्या उबाठा गटाने शिर्डीसह राज्यातील 17 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यातून शिर्डी लोकसभेसाठी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. तर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणास कामाला लागा असे आदेश दिल्याने शिर्डी लोकसभा आपणच लढविणार असल्याचे सांगत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी तुप घोटाळ्यात हात घालून प्रचारालाही सुरुवात केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच गेल्या दोन पंचवार्षिकपासून उमेदवारीची आशा बाळगून असलेल्या काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांनीही उमेदवारीवरुन स्वपक्षावर निशाणा साधला असून वेगळी वाट निवडण्याचेही संकेत दिले आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रेऽ’चा नारा दिल्याने यंदा आजी-माजी बंडखोरांमध्ये होणारी शिर्डी लोकसभेची निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मागील 15 वर्षांपासून संयुक्त शिवसेनेच्या ताब्यात असलेला शिर्डी लोकसभा मतदार संघ सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दीड वर्षांपूर्वी संयुक्त असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी सत्ता सहभाग घेतला. त्यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभाध्यक्षांनी मूळ शिवसेना शिंदेंकडे सोपविल्याने उद्धव ठाकरे प्रचंड संकटात सापडले. मात्र त्यावर मात करीत त्यांनी नव्याने पुन्हा पक्षाची उभारणी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी जुन्या शिवसैनिकांना साद घातल्याने मोठ्या फूटीनंतरही शिवसेना पुन्हा उभी राहत आहे. अशातच 2019 साली धनुष्यबाण चिन्हावर विजय मिळवणारे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात प्रवेश केल्याने उबाठा गटाकडून शिर्डीत कोणाला उमेदवारी दिली जाईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

मात्र अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी 2014 सालच्या निवडणुकीपूर्वी पक्षाशी बंडखोरी करुन काँग्रेसमध्ये जात शिवसेने समोरच आव्हान उभे करणार्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वाकचौरे यांनी काँग्रेसनंतर भाजपमध्येही प्रवेश केला होता हे विशेष. तर, विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी वाहत्या वार्याच्या दिशेने आपला झेंडा उंचावून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मात्र भाजपाने मिशन 45 अंतर्गत आपल्यासह मित्रपक्षांच्या जागांवरही अंतर्गत खासगी सर्व्हे करुन उमेदवाराच्या जिंकण्याची क्षमता पडताळली. त्यात लोखंडे यांच्याबाबत नकारात्मक अहवाल मिळाल्याने भाजपकडून लोखंडे यांच्या नावाला विरोध होवून माजीमंत्री बबन घोलप, मनसेचे माजी आमदार बाळा नांदगांवकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे धाबे दणाणलेल्या लोखंडे यांनी वर्षा बंगल्यावर जावून ठाण मांडल्याचेही वृत्त समोर आले होते.

त्यांच्या ‘या’ भेटीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘कामाला लागा’ असा आदेश दिल्याचा दावा करीत लोखंडे यांनी सोमवारी शिर्डीत पत्रकार परिषद घेवून आपण केलेल्या कामांची यादीच सादर केली. गायब खासदार हा आपल्या विरोधातील खोटा प्रचार असल्याचे सांगत त्यांनी निळवंडे धरण, कालवे, बचत गटांसाठी 22 कोल्ड स्टोअरेज अशा अनेक कामांचे दाखले देत जनतेच्या मनातील खासदार आपण असल्याचेही सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या विरोधात खोटा प्रचार करणार्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे शरसंधान करताना त्यांनी साईबाबा संस्थानमधील तुप घोटाळाही समोर आणून एकप्रकारे आपल्या प्रचारालाही सुरुवात केली. त्यावरुन शिंदेगटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात असले तरीही त्याबाबत अधिकृत घोषणा नसल्याने अद्यापही साशंकता कायम आहे.

एकंदरीत शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आपापले उमेदवार निश्चित झाल्याचे मानल्यास आजच्या स्थितीत शिर्डी लोकसभेत संयुक्त शिवसेनेशी गद्दारी करणार्या भाऊसाहेब वाकचौरे व उबाठा शिवसेनेशी गद्दारी करणार्या सदाशिव लोखंडे या दोन्ही बंडखोरांमध्येच खरी लढत होणार असल्याचे दिसून येते. मात्र त्याचवेळी जागावाटपाच्या वाटाघाटीत योग्य सन्मान दिला गेला नाही, अपेक्षेप्रमाणे जागा देण्याची तयारी दर्शविली नाही असा आरोप करीत अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रेऽ’चा नारा दिल्याने आणि त्यातच आता काँग्रेसचे दिवंगत नेते अॅड.प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या उत्कर्षा यांनीही शिर्डीच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त करीत वेगळ्या वाटेने जाण्याचे संकेत दिल्याने यंदाच्या निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघात अनुसूचित जाती-जमातीचा बर्यापैकी प्रभाव आहे. त्यामुळे वंचितने या मतदार संघात आपला उमेदवार उभा केल्यास त्याचा थेट फटका महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना बसेल. तर गेल्या दोन्ही वेळच्या निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदार संघातील उर्वरीत पाचही तालुक्यांमध्ये मोदी लाटेचा प्रभाव निर्माण होवूनही अकोले तालुक्याने मात्र त्या विरोधात जावून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठबळ दिले आहे. मात्र आता अकोल्याच्या रहिवाशी असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनीही उबाठाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करीत वेगळा निर्णय घेण्याची मानसिकता दाखवल्याने अकोल्यातील जनता महाविकास आघाडीसोबत राहतील का? असाही प्रश्न निर्माण होवू शकतो.

