धनादेशाच्या अनादर प्रकरणातून निर्दोष मुक्तता! संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांचा निर्वाळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मालट्रकच्या व्यवहारापोटी पतपुरवठा करणार्‍या आस्थापनेचे कर्ज फेडण्याची जबाबदारी स्वीकारुन सुरक्षा म्हणून दिलेल्या दोन कोर्‍या धनादेशातील एक बँकेत भरण्यात आला, मात्र खात्यात आवश्यक रक्कम नसल्याने तो माघारी आला. या प्रकरणी मालट्रकचे मूळमालक रऊफ अब्दुल शेख यांनी राहाता तालुक्यातील राजू आदिनाथ वाघमारे यांच्या विरोधात चलनक्षम कायद्याच्या कलम 138 नुसार संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे कैफीयत दाखल केली. यावरील सविस्तर सुनावणीत मालट्रक विक्रीचा व्यवहारच बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

याबाबतची माहिती अशी की, संगमनेर शहरात मालट्रक विक्रीचा व्यवसाय करणार्‍या रऊफ अब्दुल शेख (रा.बोटा, ता.संगमनेर) यांनी सावळीविहीर (ता.राहाता) येथील राजू आदिनाथ वाघमारे यांना नोटरी नोंदवून आपला ट्रक विकला. सदर वाहनावर एका खासगी पतपुरवठा करणार्‍या आस्थापनेचे 5 लाख 61 हजार रुपयांचे कर्ज होते. व्यवहाराच्यावेळी सदरचे कर्ज फेडण्याची संपूर्ण जबाबदारी राजू वाघमारे यांनी स्वीकारली होती. त्यापोटी सुरक्षा म्हणून शेख यांनी वाघमारेंकडून दोन कोरे धनादेशही घेतले होते. त्यातील एका धनादेशावर शेख यांनी 1 लाख 35 हजार रुपयांची रक्कम लिहून तो बँकेत भरला. मात्र वाघमारेंच्या बँक खात्यात पैसे नसल्याने तो न वठता माघारी आला. त्यामुळे शेख यांनी संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव जाधव यांच्या न्यायालयात कैफीयत मांडली.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या उलटतपासणीत सदरच्या वाहनाचा व्यवहार बेकायदा झाल्याचे आणि या व्यवहारातून घेतलेले दोन्ही धनादेश केवळ सुरक्षा म्हणून स्वीकारल्याची बाब रऊफ शेख यांना मान्य करावी लागली. तक्रारदाराने दिलेला कबुली जवाब आरोपीकडून त्यांना कायदेशीर देणे लागत नसल्याची बाब स्पष्ट करणारा ठरला. त्यातून या व्यवहारापोटी आरोपीला 1 लाख 35 हजारांची रक्कम देणे राहत नसल्याचेही समोर आले. दोन्ही बाजूंचा जोरकस युक्तीवाद, सादर झालेले विविध कागदपत्री पुरावे आणि अशा प्रकरणांमध्ये यापूर्वी वरीष्ठ न्यायालयांनी दिलेले निर्वाळे यांचा विचार करुन अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव जाधव यांनी राजू आदिनाथ वाघमारे यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अ‍ॅड.राजू बबनराव खरे यांनी बाजू मांडली, त्यांना अ‍ॅड.सुहास गोर्डे व अ‍ॅड.विजय देवगिरे यांनी साहाय्य केले. तर फिर्यादी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.जी.आर.मेंद्रे यांनी कामकाज पाहिले.

Visits: 90 Today: 1 Total: 1106608

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *