संगमनेरच्या ऐतिहासिक आठवडे बाजाराचे विकेंद्रीकरण! कोविडचा ठळक परिणाम; निम्म्या गावठाणात विस्तारलेला बाजार आकुंचला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडपूर्व काळापर्यंत चाळीस-पन्नास गावांतील लोकांनी दिवसभर गजबजणारा संगमनेरचा आठवडे बाजार कालौघात आता आकुंचला आहे. दोन वर्षाच्या या भयान कालावधीत अनेकांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्या, तर अनेकांनी घराकडील वास्तव्यात मिळालेल्या पुंजीतून व्यवसाय उभे केल्याने गावागावात सुपरशॉपी उभ्या राहिल्या. या काळात बाजार भरवण्यास मनाई असल्याने शहरातील चौफुल्या आणि मोठ्या आकाराच्या चौकांमध्ये छोटेखानी भाजीबाजारही भरु लागले. त्यामुळे संक्रमणाचा कालावधी उलटल्यावर या सर्व गोष्टी पूर्ववत होईल अशी अपेक्षा फोल ठरली आहे. कोविडचा हा दृष्य परिणाम दिसत असला तरी पूर्वी आठवडे बाजारांना चीजवस्तू खरेदीसह लोकांशी भेटीगाठी आणि संवादाचे मुख्य साधन मानले जात. ठराविक ठिकाणी माणसं जमून सुख-दुखःच्या गोष्टी करत. मात्र डिजिटल क्रांतीतून प्रत्येकाच्या हाती मोबाईल आल्याने त्याचाही परिणाम ‘आठवडे बाजार’ या परंपरेवर झाल्याचे दिसते. त्यामुळे चाळीस-पन्नास गावांतील बाई-माणसांनी गजबजून जाणारा आणि निम्म्याहून अधिक गावठाणात विस्तारणारा संगमनेरचा आठवडे बाजार आता इतिहास जमा होता की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

शिवकालापासून संगमनेरच्या बाजारपेठेला मोठे महत्त्व आहे. परकिय आक्रमकांच्या घोड्यांच्या टापांनी कणखर बनलेले अमृतवाहिनीच्या काठावरील संगमनेर अनेक घटना आणि घडामोडींचे केंद्र राहिले आहे. अलिकडेच ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांनी एका शिक्षण संस्थेतील कार्यक्रमात शिवजन्म काळातील संगमनेर व परिसराचे वर्णन केले. अर्थात त्यांनी केलेल्या दाव्यांना कोणता आधार आहे यावरुन वाद निर्माण झाले आहेत, त्याची सत्य-असत्यता कालांतराने समोरही येईल. मात्र त्यातून संगमनेरचे त्यावेळी असलेले महत्त्व लक्षात घेतले तर येथील बाजारपेठ किती प्रगत असेल याची कल्पना येते. कापड, सोने, चांदी, वेगवेगळ्या धातुची भांडी, गृहोपयोगी सामान, किराणा-भुसार अशा कितीतरी चीजवस्तुंची असंख्य दुकाने-दालने संगमनेरात आहेत.

अगदी शंभराहून अधिक वर्षांचा व्यावसायिक इतिहास असलेले अनेक प्रकारचे व्यावसायिकही संगमनेरात आहेत. संगमनेर तालुका आकाराने खूप मोठा आणि विस्तीर्ण आहे. तालुक्यातील 174 गावे आणि सव्वा दोनशेहून अधिक वाड्या-वस्त्यांमध्ये सहा लाखांहून अधिक लोकसंख्या विस्तारली गेली आहे. अर्थात त्यात पठारभागातील 46 गावे, आश्वी गटातील बारा गावे, तळेगाव व निमोण भागात येणारी सुमारे पन्नासहून अधिक गावे यांच्यासाठी त्या-त्या गावांच्या केंद्रस्थानी असलेली मोठी गावे व्यावसायिक केंद्र बनली. मात्र यातील बहुतेक सर्व ठिकाणचे अनेक व्यापारी व ग्राहक शनिवारचा संगमनेरचा आठवडे बाजार न चुकता करीत. यासर्वात राहिलेल्या चाळीस-पन्नास गावांसाठी संगमनेर हेच केंद्र असल्याने येथील आठवडे बाजार म्हणजे बायाबापड्यांच्या गर्दीने दिवसभर गजबजलेला दिवस ठरायचा.

त्यामुळे नेहरु चौकातून बाजाराचे केंद्र मानल्यास तेथून सय्यदबाबा चौक, लखमीपुरा मशिदपर्यंतचा परिसर, मेनरोड, पार्श्वनाथ गल्ली, जगदीश मंदिराचा परिसर, चंद्रशेखर चौक, घासबाजार, भारत चौक, पेटीट विद्यालयाचा संपूर्ण परिसर, नवीन मराठी शाळा, लालाजी चौक, संपूर्ण बाजारपेठ इतक्या मोठ्या भागात हा बाजार विस्तारत गेला. संगमनेरात बाजारात स्थानिकसह आसपासच्या जिल्हा आणि तालुक्यातील अनेक व्यापारी आणि बाजारकरु दर शनिवारी संगमनेरच्या बाजारपेठेत हजेरी लावत. पूर्वी मोबाईल नसल्याने प्रत्यक्ष भेट हाच संवादाचे मुख्य साधन होते. त्यामुळे आठवडे बाजाराचे निमित्त साधून गावोगावची मंडळी शहरात येत. प्रत्येकाच्या थांबण्याचे ठेपे ठरलेले असल्याने परगावाहून आलेले पाहुणेही बरोबर ठिकाणावर पोहोचत. दिवसभर भेटीगाठी संवाद, शहरातून करायची कामे आणि जातांना आठवड्याचा किराणा, भाजी, मुलांना खाऊ आणि गरजेच्या चीजवस्तू घेवून मंडळी गावाकडे परतत असत.

मोबाईल क्रांती आणि गेल्या काही वर्षात वाढलेल्या भुसार माल, कापड व दागिन्यांच्या दुकानांमुळे शहराच्या आर्थिक उलाढालीचे विकेंद्रीकरण नक्कीच झाले आहे. मात्र तरीही संगमनेरचा आठवडे बाजार आपले महत्त्व बाळगून होता. दोन वर्षांपूर्वी कोविडने घाव घातला आणि सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांवर जागतिक निर्बंध घातले गेले. माणसांच्या एकत्र येण्यालाच मनाई झाल्याने एकाच ठिकाणी गर्दी होवू नये म्हणून जीवनावश्यक गोष्टी मिळण्याची ठिकाणं वाढवण्याची गरज निर्माण झाली. त्यातच दीर्घकाळ टाळेबंदीने अनेक उद्योग कोलमडले आणि हजारोंचे रोजगारही गेले.

त्यातील अनेकांनी आजवरच्या परिश्रमातून साठवलेल्या पैशांचा सद्पयोग साधीत गावाकडे सुपर शॉपीच्या नावाने व्यवसाय सुरु केले. आठवडे बाजार बंद, बसेस बंद त्यामुळे गावातूनच सगळंकाही मिळण्याची गरज निर्माण झाल्याने काहींनी मागणीनुसार व्यवसाय सुरु केले. सलग दोन वर्ष कोविडची हाहाकार सुरु होता, त्यामुळे या काळात ठिकठिकाणी निर्माण झालेले छोटे -छोटे भाजी बाजार आता स्थायी झाले आणि मोठेही झाले. या व्यवसायातही शेतकरी नसलेले अनेक बेरोजगारही समाविष्ट झाल्याने एकीकडे कोविडने संगमनेरच्या ऐतिहासिक आठवडे बाजाराचे विक्रेंद्रीकरणही केले, आणि दुसरीकडे संक्रमणाचा फटका बसलेल्या अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचेही काम केले.

स्थित्यंतर हा प्रकृतीचा स्वभाव असला तरी संगमनेरच्या बाजारपेठेने आपले महत्त्व गेली चारशे वर्ष अव्याहत ठेवले आहे. मोगलकाळात सुभा असलेल्या संगमनेरच्या महसुलाचा जपशिल संगमनेर महाविद्यालयाने पूर्वी प्रकाशित केलेल्या एका संदर्भ ग्रंथात विस्तृतपणे केलेला आहे. त्यावरुनही संगमनेरच्या बाजारपेठेची प्रगल्भता आणि इतिहास लक्षात येतो. कोविड संक्रमणानंतर जागोजागी आणि गावोगावी सुपर शॉपी अथवा भाजीबाजार उभे राहिले असले, तरीही त्यातून भेटीची तहान मात्र भागू शकत नसल्याने संगमनेरच्या बाजारपेठेचे ऐतिहासिक महत्त्व यापुढेही अबाधितच राहील यात शंका नाही.

कोविड संक्रमणानंतर बाजारपेठेच्या स्थित्यंतराचा विषय ठळकपणे आला असला तरीही केवळ पारंपारिक स्वरुप असलेल्या अनेक व्यावसायिकांनी आपल्या पारंपरिक पेढ्यांमध्ये आधुनिकता आणल्याने त्यांचा नावलौकीक आसपासच्या तालुक्यांतच नव्हेतर जिल्ह्यातही पसरला आहे. त्यामुळे एका चौकाच्या मध्याला धरुन विस्तारलेला बाजार आज ठराविक चौक आणि रस्त्यांच्या मर्यादा ओलांडून शहरभर पसरला आहे. याचा फायदा ठराविक एक भागातील व्यापार्यांना न होता त्याचा विस्तार झाल्याने अनेकांच्या जीवनात समृद्धीही आली आहे. त्यामुळे एकीकडे बाजार विकेंद्रीकरणाचा ऐतिहासिक परंपरेवरील परिणाम दिसत असला तरीही दुसरीकडे त्याचे व्यापक स्वरुपच बघायला मिळत आहे.

संगमनेरच्या बाजारपेठेला शिवकालापासून अनन्य महत्त्व आहे. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या संगमनेरच्या वास्तव्यातही याचा उल्लेख आठळतो. नंतरच्या काळातील पेशवाई असो अथवा मोगलाई यांच्या कालखंडातही संगमनेरच्या बाजारपेठेचा अनेक प्रसंगी उल्लेख आहे. मोगलांच्या सत्ताकाळात संगमनेर सुभ्यात अगदी नाशिक जिल्ह्यातील बहुतेक भाग मोडत होता. त्यावेळचा सगळा महसूल संगमनेरात जमा होत व येथून पुढे तो औरंगाबादेला पाठवला जात असे. त्यामुळे येथे नेहमी हजारोंच्या संख्येतील सैनिकांचा राबता असत, सरदारांचे कुटुंब कबीले असतं. त्यांच्या गरजा भागवण्यासाठी संगमनेरची बाजारपेठ फुलत गेली ती आज शहरभर विस्तारली आहे.

