पुणतांब्यातून चोरट्यांनी 3 लाख 72 हजारांचा ऐवज लांबविला राहाता पोलिसांत गुन्हा दाखल; नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण
नायक वृत्तसेवा, राहाता
घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या घराचे व उकाड्याने हैराण होत असल्याने घराच्या गच्चीवर झोपण्यास गेल्याचा फायदा उठवत 3 लाख 72 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना पुणतांबा (ता. राहाता) येथील भरबाजारपेठेत घडली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुणतांबा येथील बाबासाहेब सखाराम शिकारे (वय 53) यांचा मुलगा मनोज हा नाशिक येथे नोकरीस असून बुधवारी (ता. 13) रात्री 8 वाजता बाबासाहेब शिकारे व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून मुलगा मनोज शिकारे यास भेटण्यासाठी नाशिक येथे गेले होते. गुरुवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या घराशेजारी राहणारे ऋषीकेश संजय जगदाळे यांना शिकारे यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी ही माहिती शिकारे यांना दिली. त्यानंतर 11.30 वाजता पुणतांबा येथे ते आले. त्यांनी घरात जावून पाहिले असता बेडरुममधील कपाटाच्या लॉकरची उचकापाचक करुन चोरट्याने 87 हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व 10 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 97 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
याबाबत राहाता पोलिसांत बाबासाहेब सखाराम शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुरनं. 168/2022 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करत आहेत. तर दुसरी घटना पुणतांबा येथेच घडली आहे. येथील टायर व्यावसायिक अशोक दगडू जेजुरकर यांच्या घरात बुधवारी रात्री 11.30 ते गुरुवारी सकाळी 5 वाजेच्या चोरी झाली आहे. उन्हाळा असल्याने अशोक जेजूरकर, पत्नी व दोन मुले घराचे कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले. गुरुवारी सकाळी 5 वाजता ते झोपेतून उठल्यानंतर त्यांना जिन्याला बाहेरुन कुलूप लावल्याचे दिसून आले. त्यामुळे जेजूरकर यांनी बाथरुमवरुन उडी मारत खाली जाऊन जिन्याची कडी उघडली व घराच्या दरवाज्याकडे बघितले असता घराचे कुलूप त्यांना तुटल्याचे दिसून आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरुमचे कपाट उघडून उचकापाचक करून त्यात ठेवलेले कपडे व सामानाची उचकापाचक झालेली दिसून आली. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सहा तोळे सोन्याचे दागिने व 1 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला आहे. याबाबत राहाता पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुरनं. 167/2022 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करत आहे.