तीनबत्ती हल्लाप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक! एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी;  तर यापूर्वी पकडलेल्या आरोपींची जामिनावर मुक्तता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 6 मे रोजी शहरातील तीनबत्ती चौकात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जमावाने गस्ती पथकावरील पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी अज्ञात जमावा विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांची जामीनावर सुटका झाली असून आज पहाटे पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याची रवानगी एका दिवसाच्या पोलीस कोठडीत केली आहे. त्यामुळे तीनबत्ती प्रकरणात निष्पन्न होऊन अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पंधरा झाली आहे.

मागील पंधरवड्यातील गुरुवारी (ता.6) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संगमनेर शहरातील मोगलपूरा भागात मोठी गर्दी जमल्याने अहमदनगरहून बंदोबस्तासाठी आलेल्या आणि गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने गर्दीला हटकले. मात्र तरीही काहीजण पोलिसांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी काहींना काठीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येवून काहींनी जमलेल्या जमावाला चिथावणी दिली, त्याचा परिणाम जमावातील काहींनी पोलिसांसह त्यांच्या वाहनावर तुफान दगडफेक करायला सुरुवात केली. पोलीस बळ कमी आणि जमावाची संख्या मोठी असल्याने प्रसंगावधान राखून पोलिसांनी मोगलपूर्‍यातून माघार घेत तीनबत्ती चौकाकडे जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र यादरम्यान कमल पेट्रोल पंपासमोरील मोगलपूर्‍याच्या बोळापासून ते तीनबत्ती चौकापर्यंतच्या तीनशे ते चारशे मीटर अंतरात पायी चालणार्‍या पो.कॉ.सलमान शेख, प्रशांत केदार व भगीरथ देशमाने या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. तीनबत्ती चौकात तर जमावाने सलमान शेख या पोलीस कर्मचार्‍यास घोळक्यात घेवून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा कावा लक्षात आल्यानंतर शेख यांनी तेथून स्वतःला बाजू केल्याने एकप्रकारे त्यांचा जीव वाचला. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण होवून राज्यभर त्याचे पडसाद उमटले. घटनेच्या दिवशी रात्री पोलिसांनी वरील परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून आरोपींची ओळख पटविण्यास सुरुवात केली.

त्यातून सुरुवातीला मुसेब अल्लाउद्दिन शेख (वय 31, रा.अपनानगर), आसिफ मेहबुब पठाण (वय 31, रा.मोगलपूरा), सय्यद युनुस मन्सूर (वय 24, रा.गवंडीपूरा) व मोसीन इमाम शेख (वय 35, रा.जम्मनपूरा) या चार आरोपींना गेल्या शुक्रवारी (ता.7) अटक केली. एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्या चौघांचीही जामीनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘अटकसत्र’ स्थगीत केल्याने जवळपास आठवडाभर ‘तीनबत्ती’ प्रकरण मागे पडले होते. मात्र शुक्रवारी (ता.14) रमजान ईद साजरी होताच, शनिवारी (ता.15) मध्यरात्री पोलिसांनी पुन्हा एकदा तीनबत्ती प्रकरणाची फाईल उघडीत मोगलपूरा, लखमीपूरा, सय्यदबाबा चौक, नायकवाडपूरा, जोर्वेनाका, भारतनगर अशा मुस्लिम बहुल विभागांना वेढा घालीत सरसकट घरझडती घेतली.

रविवारी (ता.16) पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु असलेल्या या ‘कोम्बिंग’ ऑपरेशनमधून निष्पन्न 35 आरोपींमधील शिल्लक 31 पैकी नऊ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यात रिझवान मोहंमदखान चौधरी (वय 31, रा.अपनानगर), इर्शाद अब्दुल जमीर (वय 37) व अरबाज अजीम बेपारी (वय 20, दोघेही रा.भारतनगर), सय्यद जोयेबअली शौकत सय्यद (वय 27, रा.तीनबत्ती), अर्शद जावेद कुरेशी (वय 18) व शफीक इजाज शेख (वय 24, दोघेही रा.लखमीपूरा), मोहंमद मुस्ताफ फारुक कुरेशी (वय 35) व फारुक बुर्‍हाण शेख (वय 45, दोघेही रा.मोगलपूरा) या नऊ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. रविवारी (ता.16) त्यांना संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यां समोर उभे केले असता त्यासर्वांना मंगळवारपर्यंत (ता.18) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

रविवारी पहाटे पोलिसांनी मुस्लिम बहुलभागात छापासत्र अवलंबून धरपकड सुरु केल्याने गेल्या पंधरवड्यापूर्वी वाघ होवून पोलिसांवर धावून गेलेल्या जमावातील आरोपी शेळ्या होवून पसार झाले आहेत. सोमवारी (ता.17) पोलिसांनी संशयीतांच्या शोधासाठी काही ठिकाणी छापे घातले होते. त्यातून ‘त्या’ घटनेच्यावेळी जमावाला चिथावणी देवून हल्ला करण्यास सांगणारा व मूळचा मालेगाव येथील असलेला मात्र सध्या संगमनेरातील कुरणरोडवरील मोगल टेकडीवर स्थिरस्थावर झालेला मोहंमद कासिम पापा शेख (वय 25) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. उर्वरीत आरोपींचाही पोलीस सध्या कसून शोध घेत आहेत. त्यानुसार आज (ता.23) पहाटे तीनच्या सुमारास लखमीपूऱ्यात राहणाऱ्या अजीम सलीमखान पठाण (वय 28 वर्षे, रा. लखमीपुरा) याला उचलण्यात आले. त्याला आज संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. यापूर्वी अटक झालेल्या सर्व आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. तीनबत्ती हल्ला प्रकरणात निष्पन्न होवून आत्तापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पंधरा झाली आहे. 

  

गेल्या 6 मे रोजी तीनबत्ती चौकात घडलेल्या या घटनेनंतर संगमनेर तालुक्यासह संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त झाला होता. कोविड नियमांचे पालन करण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्याची ही कृती कायद्याच्या विरोधातील असल्याने संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या गैरहजेरीत या प्रकरणातील जवळपास 35 पेक्षा अधिक आरोपींना निष्पन्न केले. गेल्या आठ दिवसात आरोपींच्या अटकेसाठी त्यांनी वारंवार छापासत्र राबवून आत्तापर्यंत 15 आरोपींना गजाआडही केले. या प्रकरणात अजूनही अनेक जण पसार आहेत. शेवटचा आरोपी गजाआड होईपर्यंत पोलीस घटनेचा तपास सोडणार नाहीत, असे यापूर्वीच मदने यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे तीनबत्ती प्रकरणात अधूनमधून आरोपींची अटक होण्याचे प्रकार सुरुच राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यापूर्वी पोलीस कोठडीत असलेल्या नऊ जणांच्या चौकशीतून आणखी पंधरा ते अठरा जणांची नावे समोर आल्याची माहिती आहे. त्यांचाही पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे.

Visits: 30 Today: 1 Total: 117537

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *