बोटा शिवारातील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! 1 लाख 79 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त तर अकरा जणांवर गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील पठारभाग पुन्हा एकदा अवैधंद्यांमुळे चर्चेत आला आहे. बुधवारी (ता.27) सुरू असलेले अन्नत्याग उपोषण सोडविण्यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे आलेले असताना दुपारी 4 वाजेच्या सुमारास बोटा शिवारातील पिराच्या ओढ्याच्या कडेला उघड्यावर सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगारावर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. यामुळे जुगार्यांची एकच धांदल उडाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 79 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही कारवाई झाल्याने घारगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बोटा शिवारात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी अचानक पिराच्या ओढ्याजवळ सुरू असलेल्या तिरट नावाच्या हारजितीच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामुळे जुगार्यांची एकच धांदल उडाली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाइल, मोटारसायकली व जुगार साहित्य असा एकूण 1 लाख 79 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक लक्ष्मण खोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आत्माराम किसन सुकाळे (वय 54, रा.डिंगोरे, ता.जुन्नर), विश्वनाथ बबन कावडे (वय 43, रा.बेल्हे, ता.जुन्नर), नामदेव काळूराम तळपे (वय 32, रा.आळे, ता.जुन्नर), मारुती बबन गुंजाळ (वय 42, रा.आळे, ता.जुन्नर), मीनीनाथ शशीकांत घाडगे (वय 38, रा.कांदळी, ता.जुन्नर), रोहित किरण शहा (वय 38, रा.ओतूर, ता.जुन्नर), सुनील गेणूभाऊ कुर्हाडे (वय 48, रा.आळेफाटा, ता.जुन्नर), दत्तात्रय सदाशिव फापाळे (वय 32, रा.जाचकवाडी, ता.अकोले), नजरअली असगर सय्यद (वय 48, रा.मंचर, ता.आंबेगाव), जितेंद्र बबन घाडगे (वय 36, रा.पिंपळवंडी, ता.जुन्नर), सुभाष ज्ञानदेव मुसळे (वय 40, रा.बोटा, ता.संगमनेर) या अकरा जणांवर गुरनं.125/2022 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. कैलास देशमुख हे करत आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
घारगाव पोलीस नेहमीच वाळू, चोर्या आणि अवैध धंद्यांमुळे चर्चेत असते. राजरोसपणे अवैध धंदे सुरू असतानाही स्थानिक घारगाव पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा नागरिकांत सुरू आहेत. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून कारवाई केल्याने घारगाव पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.