राष्ट्रवादीच्या आमदारांकडून लिंबूपाणी घेत सेनानेत्याच्या उपोषणाची सांगता! पोलीस ठाण्याचे स्थलांतर रोखले; अन्यथा महामार्गावरील टोलवसुली बंद पाडू..

नायक वृत्तसेवा, घारगाव
महामार्गाच्या कामासाठी घारगावने आपल्या बाजारपेठेचा बळी दिला आहे. पठारची राजधानी म्हणून घारगावकडे पाहीले जाते. भविष्यात संगमनेर तालुक्याचे विभाजन झाल्यास घारगाव तालुक्याची निर्मिती अटळ आहे. त्यामुळे येथील महत्त्व कमी होणार नाही यासाठी आपण राज्याच्या गृहमंत्र्यांशी चर्चा करुन घारगाव पोलीस ठाण्याचे स्थलांतर रोखले आहे. घारगावकरांनी ज्याप्रमाणे पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली, तशीच आणखी जागा दिल्यास येथे महावितरण कंपनीचे उपकेंद्र सुरु करण्यासही आपले प्राधान्य राहील. त्यासाठी आपला आमदार निधीही खर्च करण्याची तयारी आहे. महामार्ग प्राधिकरण रस्त्याच्या बाबतीत प्रतिसाद देत नसल्याने त्यांना ‘अल्टीमेटम’ देवून कामे पूर्ण होईस्तोवर टोल वसुली बंद करावी लागणार असल्याचे प्रतिपादन अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी बुधवारी घारगाव येथे केले.

घारगाव पोलीस ठाण्याचे डोळासणे येथे स्थलांतर करण्याच्या निर्णयासह घारगाव व परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी सोमवारपासून (ता.25) अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. आंदोलनाच्या तिसर्या दिवशी अकोले मतदार संघाचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी घारगाव येथे येवून आहेर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ठोस कृतीचे आश्वासन देत सर्व समस्या सोडविण्याबाबत त्यांना आश्वस्थ केले, यावेळी बोलतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह घारगाव, बोटा, बोरबन, आंबीखालसा येथील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या आश्वासनानंतर त्यांच्याच हस्ते लिंबूपाणी घेवून आहेर यांनी आपले अन्नत्याग आंदोलन तिसर्या दिवशी मागे घेतले.

यावेळी गावकर्यांशी संवाद साधताना आमदार डॉ.लहामटे पुढे म्हणाले की, पठारभागाच्या महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी जनार्दन आहेर गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. खरेतर त्यांनी उपोषण करु नये ही आपली भूमिका होती, त्यासाठी मी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या संपर्कातही होतो. मात्र नेमका शब्द मिळाल्याशिवाय पोकळ आश्वासन देवून वेळ मारुन नेणं आपल्या स्वभावात नसल्याने त्यांना भर उन्हाळ्यात तीन दिवस उपाशी पोटी रहावे लागले. मात्र त्याची फलश्रृती आपल्या सर्वांसमोर असून गृहमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपली मागणी मान्य केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आपण निवडून आल्यापासून मतदार संघात पाण्याची कमतरता नसल्याकडे लक्ष्य वेधतांना त्यांनी नुसते पाणी असून काय उपयोग, त्यासाठी वीज उपलब्ध असेल तरच त्याचा वापर करता येईल. त्यासाठी घारगाव परिसरातील शेतकर्यांना पूर्णदाबाने विद्युत पुरवठा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्याप्रमाणे घारगावकरांनी पोलीस ठाणे व कर्मचारी वसाहतीसाठी जागा उपलब्ध करुन दिली, त्याप्रमाणे आणखी जागा दिल्यास घारगावला वीज कंपनीचे उपकेंद्र सुरु करण्यासही आपण पुढाकार घेवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ऊर्जाखात्याकडे निधीची कमतरता असल्याने या कामासाठी लागणारा पैसा आपल्या विकास निधीतून देण्याची तयारीही त्यांनी दाखवली.

महसूल, कृषी व वन विभागाच्या संदर्भात त्या त्या विभागाच्या अधिकार्यांनी आहेर यांची भेट घेवून सकारात्मक निर्णय घेतले आहेत. पोलीस ठाणे व कर्मचार्यांच्या निवासस्थानांचा विषयही मार्गी लागला आहे. मात्र पुणे-नाशिक महामार्गाच्या बाबतीत असलेले प्रश्न आजही कायम असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आपण महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्राधिकरणाला 15 दिवसांचा ‘अल्टीमेटम’ देवून कामे होईस्तोवर टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी संगमनेरच्या तहसीलदारांना प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना केल्याची माहिती देताना आपणही केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणाले.

पुणे-नाशिक महामार्गासाठी घारगाव, बोट्याने आपल्या बाजारपेठांचे बलिदान दिले आहे. पठारभागाची राजधानी म्हणून घारगावचा लौकीक आहे. भविष्यात संगमनेर तालुक्याचे विभाजन होवून पठारभागासाठी घारगाव तालुक्याची निर्मिती होणे निश्चित आहे. त्यामुळे पोलीस ठाणे घारगावमध्येच असावे या भूमिकेशी आपण पूर्णतः सहमत असल्याचे आमदार डॉ.लहामटे यांनी यावेळी सांगितले. जागा उपलब्ध नव्हती म्हणून येथील पोलीस ठाणे डोळासणे येथे हलविण्याचा निर्णय झाला होता, मात्र आता हा विषय संपला असून गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करुन लवकरच बांधकामाला सुरुवात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

अकोले मतदारसंघ आपला परिवार असून येथील नागरिकांच्या समस्या सोडवतांना आपण पक्षीय मर्यादाही पाळत नाही आणि त्याच्या परिणामांचाही विचार करीत नाही. त्यामुळे येथील जनतेच्या प्रश्नांना आपण बांधिल असून ज्या प्रश्नांवर जनार्दन आहेर यांनी आंदोलन केले ते सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी ग्वाही आपण देत आहोत. यातील एकही प्रश्न शिल्लक राहीला तर त्यासाठी आपण स्वतः जबाबदार राहू असे सांगत त्यांनी उपस्थितांना आश्वस्थ केले. जनतेचे प्रश्न घेवून ते सोडवण्यासाठी झटणार्या शिवसैनिकांसमोर धर्मवीर आंनद दिघेंचा आदर्श आहे. अशा आंदोलनाला जनताही डोक्यावर घेते, जनार्दन आहेर यांच्या उपोषणाला घारगावच्या पंचक्रोशीने दिलेला पाठींबा हेच दर्शवित असल्याचे सांगत आता सर्वप्रश्न मार्गी लागल्याने आंदोलन स्थगित करण्याची विनंती त्यांनी केली. त्यानुसार त्यांच्याच हाताने लिंबूपाणी घेवून गेल्या सोमवारपासून सुरु असलेल्या आंदोलनाची सांगता झाली.

गेल्या सोमवारपासून (ता.25) शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी घारगावात अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. या दरम्यान त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर कृषी, महसूल व वन विभागाच्या अधिकार्यांनी त्यांची भेट घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावले. मात्र जो पर्यंत घारगाव पोलीस ठाण्याचे स्थलांतर रोखले जात नाही आणि घारगावच्या वीज वितरणाच्या ट्रान्सफार्मरची क्षमता दुप्पट केली जात नाही, तोपर्यंत माघार न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. बुधवारी सायंकाळी अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी घारगावला येत या दोन्ही प्रश्नांवर त्यांना आश्वस्थ केल्याने त्यांच्याच हाताने लिंबूपाणी घेत त्यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेना नेत्याचे आंदोलन संपविल्याची खुमासदार चर्चाही पठारावर रंगली होती.

