ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे निवृत्त होण्याचे वृत्त निराधार!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे निवृत्त होण्याचे वृत्त निराधार!
अण्णांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे
नायक वृत्तसेवा, नगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावकर्‍यांसमोरील एका भाषणाचा संदर्भ देत हजारे आता गावाच्या कामातून निवृत्ती घेणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांतून आणि समाज माध्यमांतून सुरू झाल्या आहेत. मात्र, हजारे अशा पद्धतीने कधीच निवृत्ती घेणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हजारे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचेही गावकर्‍यांचे म्हणणे आहे.

नवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता करताना अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यामध्ये हजारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. गावासाठी आपण केलेली आंदोलने, त्यांना गावकर्‍यांची मिळालेली साथ याची काही उदाहरणेही त्यांनी सांगितली. आता गावातील अनेक तरुण कार्यकर्ते पुढे आले आहेत. त्यांनी गावासाठीचे काम नेटाने पुढे सुरू ठेवले आहे. पूर्वी अशा कामांसाठी गावकर्‍यांना माझ्या कुबड्या घ्याव्या लागत होत्या. आता कार्यकर्ते हिंमतीने काम करताना पाहून आनंद वाटतो. त्यामुळे गावाच्या रोजच्या कामात लक्ष घालणे हळूहळू कमी करत आहे, असे हजारे म्हणाले होते. त्यावरून हजारे निवृत्त होणार असल्याची चर्चा पसरली.

मात्र, अनेक गावकरी आणि कार्यकर्त्यांना यात तथ्य वाटत नाहीत. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने औपचारिकपणे बोलताना हजारे यांनी हे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे ही निवृत्तीची घोषणा नाही, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. शिवाय हजारे स्वत:ला चळवळीतील कार्यकर्ता मानतात. त्यांच्या विचारानुसार कार्यकर्ता कधीही निवृत्त होत नसतो. त्यामुळे हजारे अशी कोणतीही निवृत्ती घेतील, याची अजिबात शक्यता नाही. यासंबंधी पसरत असलेल्या बातम्यांवर हजारे यांनी केवळ स्मितहास्य करून हेच संकेत दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

बोलण्याच्या ओघात अण्णा हजारे यांनी यापूर्वी अनेकदा यापुढे आंदोलन करणार नाही, आता बस्स झाले. आता लोकांनीच आंदोलने करावी, अशीही वक्तव्य केलेली आहेत. मात्र, तीही त्यांची निवृत्तीची घोषणा नव्हतीच. शिवाय त्यानंतरही त्यांनी आंदोलने आणि कार्यही सुरूच ठेवले आहे. टाळेबंदीच्या काळातही ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाच होता. त्याची राज्य सरकारलाही दखल घ्यावीच लागली. त्यामुळे नवरात्रीच्या समारोपावेळी गावकर्‍यांशी संवाद साधताना हजारे यांनी केलेले भाषण केवळ कार्यकर्त्यांना प्रोत्साहान देण्यासाठी आहे. निवृत्ती घेणे अगर कोणावर जबाबदारी सोपविणारे मुळीच वाटत नाही, असेही कार्यकर्त्यांचे मत आहे.

 

Visits: 25 Today: 2 Total: 119090

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *