आमदार डॉक्टर तांबे यांच्यासह 51 व्या वर्षी भेटले जुने वर्गमित्र ज्ञानमाता विद्यालयातील 1971 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्ञानमाता विद्यालयातील 1971 च्या दहावीच्या बॅचमधील नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह सर्व वर्गमित्रांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अरुण जोर्वेकर यांच्या जोर्वे रस्त्यावरील फार्महाऊसमध्ये ज्ञानमाता विद्यालयातील 1971 च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी सपत्नीक या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, सह्याद्री संस्थेचे सहसचिव दत्तात्रय चासकर, अरुण जोर्वेकर,न ारायण उगले, भाऊसाहेब रहाणे, विठ्ठल रहाणे यांच्यासह एकूण 45 माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शहराच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्या बॅचचे शिक्षक डॉ. अरविंद सोनांबेकर, रत्नाकर पगारे हेही उपस्थित होते.

ज्ञानमाता विद्यालय हे शिस्तप्रिय विद्यालय म्हणून शहर व परिसरात नावारूपास आहे. 1971 च्या काळात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या शाळेमधून शिक्षण घेऊन मोठे झाले. यातील अनेक विद्यार्थी राज्यात व देशात विविध क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे ज्ञानमाता विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते वैद्यकीय क्षेत्रासह उत्तर महाराष्ट्राचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्यासह सर्व जुनी मित्रमंडळी एकत्र आल्यानंतर सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बॅचचे शिक्षक डॉ. अरविंद सोनांबेकर व रत्नाकर पगारे यांच्या प्रती सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी आमदार डॉ. तांबे म्हणाले, माणूस कितीही मोठा झाला तरी आपली शाळा, आपले गाव याबद्दल प्रत्येकाला प्रेम असते. त्यावेळेस शिक्षणाची परिस्थिती हलाखीची होती. अशा खडतर परिस्थितीतून अनेकांनी शिक्षण घेत मोठी प्रगती साधली आहे. आज मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मागील वर्षी आलेल्या कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण प्रणाली पुढे आली. मात्र सध्या कोरोणाची तीव्रता कमी झाल्याने शिक्षणात खर्या अर्थाने शिक्षणाबरोबर मैदानी खेळांनाही प्राधान्य दिले गेले पाहिजे. मोबाइलकडून मैदानाकडे वळण्याचा सल्ला यावेळी आमदार डॉ. तांबे यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच या जुन्या सर्व मित्रांबद्दल कृतज्ञता व प्रेम व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक डॉ. अरविंद सोनांबेकर व रत्नाकर पगारे यांनीही मार्गदर्शन केले. तर विविध विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दत्तात्रय चासकर यांनी करुन आभार मानले.
