गावोगावच्या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘अमृतसेना’! माजीमंत्री बाळासाहेब थोरात आक्रमक; ‘लाव रेऽ तो व्हिडिओ’ म्हणत प्रकरणाची चिरफाड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
घुलेवाडीच्या हरिनाम सप्ताहातील गोंधळाने संगमनेरचे राजकारण चांगलेच तापले असून कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या कथित ‘नथुरामा’च्या उल्लेखावरुन राळ उठवित माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सर्मथकांनी आज जोरदार पलटवार केला. शेकडोंच्या उपस्थितीत यशोधनपासून निघालेल्या या मोर्चाचे नगररस्त्यावर सभेत रुपांतर झाल्यानंतर खूद्द थोरातांनी मंचावर उभे राहून ‘लाव रेऽ तो व्हिडिओ’ म्हणत ‘त्या’ संपूर्ण प्रकरणाची चिरफाड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गावोगावी गुंडांच्या टोळ्या तयार झाल्याचा गंभीर आरोप करीत सभ्य माणसांची आब घेवून त्यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचे वक्तव्य केले. निवडून आलेल्या आमदारांनी आमच्या डीएनएची विचारणा केली आहे, त्यांना त्याचा अर्थ तरी कळतो का असा खडा सवाल करीत त्यांनी तालुक्यात दहशत निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचे काम सुरु असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘अमृतसेना’ उभी करण्याची घोषणाही केली. आजच्या निषेध मोर्चातील उपस्थिती आणि माजीमंत्री थोरात यांच्यातील आक्रमकपणा वाखाणण्यासारखा होता.

गेल्या शनिवारी (ता.16) घुलेवाडीतील मारुती मंदिरात कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. या दरम्यान रात्री साडेसदहाच्या सुमारास श्रोत्यांमध्ये बसलेल्या काहींनी महाराजांना अभंगावर बोला असे म्हणत कीर्तनात व्यत्यय आणला. त्यातून महाराज आणि श्रोता यांच्यात शाब्दीक चकमक उडाल्याने वातावरण तापले. त्यामुळे गोंधळ होवून कीर्तन ऐकण्यासाठी आलेले भाविकही निघून जावू लागल्याने कीर्तनाचा कार्यक्रम अर्धवट अवस्थेत थांबवण्यात आला. कीर्तनात झालेल्या गोंधळात सहभागी असलेले थोरात समर्थक असल्याने त्याला राजकीय किनार लागली आणि गोंधळ, धमकी, आरडाओरड, वाहनाची तोडफोड, शिवीगाळ, मारहाण अशा वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल होण्यासह कीर्तनकाराला धमकावल्याचे आरोप होवून थोरात यांना ‘हिंदूद्रोही’ ठरवण्यात आले.

त्यातून त्यांची बाजूही कमकुवत वाटत असताच कीर्तनकाराला मिळालेल्या समर्थनाने त्यांना स्फूरण चढून त्यांनी थेट माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना ‘नथुरामा’चा अवतार घेण्याची धमकी दिल्याने बॅकफूटवर गेलेल्या थोरातांना फ्रंटफूटला येण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांच्या समर्थकांनी घुलेवाडीत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाचे वास्तव शोधून काढण्यासह या प्रकरणात ज्या वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप झाला ती कार (क्र.एम.एच.14/जी.एस.2856) घटनेच्या आधीच 10 व 11 ऑगस्टरोजी अपघात झालेल्या अवस्थेत हिवरगाव टोलनाक्यावर दोनवेळा संगमनेरात येवून गेल्याचे फूटेजही मिळवले. प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी कीर्तनकार एका कृषी अधिकार्याच्या खासगी वाहनात बसून आल्याचे पुरावेही त्यांनी मिळवले.

त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या एकतर्फी आरोपांना जोरदार प्रत्यूत्तर देण्याची रणनिती आखून थोरात यांच्या समर्थकांनी आज यशोधन कार्यालयापासून निषेध मोर्चा काढून पलटवार केला. आजच्या आंदोलनाला झालेली गर्दी लक्षणीय होती. या मोर्चाचे रुपांतर नगर रस्त्यावर आल्यानंतर प्रशासकीय भवनासमोर सभेत झाले. यावेळी थोरात यांच्या समर्थकांनी ‘लाव रेऽ तो व्हिडिओ’च्या धर्तीवर घुलेवाडीच्या हनुमान मंदिरात गोंधळ सुरु होण्यापूर्वी, गोंधळ सुरु असताना, गोंधळ होवून गेल्यानंतर, महाराज पुन्हा ‘त्या’ खासगी वाहनाने रवाना होताना अशा सगळ्या ठिकाणची सीसीटीव्ही चित्रणं सादर करीत विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचे सांगताना तोडफोड झाल्याचा आरोप असलेले वाहन प्रत्यक्ष घटनेच्या चार/पाच दिवसांपूर्वीच अपघातग्रस्त असल्याचेही समोर आणले गेले. सुरुवातीला झालेला वाद कीर्तनकाराने जाणीवपूर्वक नंतर पुन्हा उकरुन काढला, त्या दरम्यान तालुक्याच्या आमदारांनी हजेरी लावल्याने त्यांच्या देहबोलीतून हा पूर्वनियोजित कट असल्याचा घणाघाती आरोपही करण्यात आला. ज्यावेळी वाद उफाळला त्यावेळी कीर्तनकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर नव्हेतर संविधानातील ‘सर्व धर्म समभाव’ या तत्वाच्या विरोधात गरळ ओकत असल्याचेही त्यांनी सचित्रण निदर्शनास आणून दिले. जगातील सर्वात खोटे आणि घाणेरडे वाक्य असा उल्लेख कीर्तनकारांकडून होत असल्याचेही त्यात ऐकू येते.

‘लाव रेऽ तो..’चा धागा पकडून अधिक आक्रमक झालेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंचावर मोठ्या पडद्यावर सुरु असलेल्या घटनांचा आशय सांगतानाच कर्मचार्यांच्या सोशल समूहात एखाद्या कार्यक्रमाला उपस्थितीचा संदेश सामान्य गोष्ट असल्याचे सांगत तो आरोपही फेटाळून लावला. घुलेवाडीतील सप्ताहात पूर्वनियोजित कारस्थानाचा गंभीर आरोप करुन माजीमंत्र्यांनी या घटनेत पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचे जाहीर वक्तव्य करीत ज्यांनी तोंड उघडले त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचे उद्योग सुरु असल्याचा व घुलेवाडी प्रकरणात गोवण्यात आलेल्या चांगल्या कुटुंबातील सुशिक्षित तरुणांना अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव करावी लागत असल्याचे उपस्थितांच्या निर्दशनास आणून दिले.

तालुक्यात सगळीकडे दहशत माजवण्याचा, तालुक्याचा विकास थांवण्याचा प्रकार सुरु असून बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडासह संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, आमदार निवासातील उपहारगृहाच्या कर्मचार्याला आमदारांकडून मारहाण, धुळ्याच्या विश्रामगृहातील नोटा सापडल्याचे प्रकरण आदींचा उल्लेख करताना त्यांनी या सगळ्यांकडून लक्ष हटवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांचा बळी घेतला, छगन भुजबळ यांचेही काय चालले आहे ते दिसतं असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवरही कोरडे ओढले. स्थानिक आमदार आपल्या डीएनएची चौकशी करीत असल्याचे सांगत माजीमंत्री थोरात यांनी ‘त्यांना’ (आमदार खताळ) याचा अर्थ तरी कळतो का असा प्रतिसवाल करीत आपल्या वंशावळीची उघड मागणी करुन आमदारांनी मातृत्वाचा अवमान केल्याचा घणाघातही त्यांनी केला.

मागे कोणीतरी मुर्खाने धांदरफळात वायफळ बोलून तालुक्याचे वातावरण खराब केले आणि आता आमदारही त्याच मार्गाने जाणार असतील तर संगमनेर तालुका अशा गोष्टी अजिबात सहन करणार नाही असे आक्रमक स्वरात सुनावताना त्यांनी गावोगावी गुंडांच्या टोळ्या निर्माण होवून खोट्या गुन्ह्यांच्या माध्यमातून चांगल्यांची आब घेतली जात असल्याचे सांगितले. तालुक्यात जे जळतंय त्याची आपल्याला झळ नाही असे समजून शहरातील नागरिकांनी या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. चांगले आणि वाईट यातील चांगले निवडण्याचा सल्ला देत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे शंखही फूंकले. आजच्या निषेध मोर्चाची उपस्थिती लक्षणीय होती.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘नथुरामा’च्या धमकीनंतर निघालेल्या मोर्चात ‘लाव रेऽ तो’च्या धर्तीवर घुलेवाडी कीर्तन आणि त्यानंतर घडलेल्या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ चित्रण सादर करुन हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी मारुती मंदिरातील सीसीटीव्हीसह हिवरगाव टोलनाक्यावरील सीसीटीव्हीचे फूटेजही मिळवले. त्याचे सादरीकरण होत असताना अतिशय आक्रमक झालेल्या माजीमंत्र्यांनी त्यानंतर जोरदार फटकेबाजी करताना अशा घटनांमधून संगमनेरचे वाटोळे करण्याचा आनंद कोणाला होणार असल्याचा प्रश्न विचारताना अप्रत्यक्षपणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

