‘सेमी-हायस्पीड’ रेल्वेमार्गासाठी आता माजी खासदारही मैदानात! मूळ आराखड्यानुसारच प्रकल्प पूर्ण व्हावा; आंबेगावपासून संगमनेरपर्यंत आंदोलनाचा वणवा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य सरकारच्या ‘महारेल’कडून गती प्राप्त झालेला ‘पुणे-नाशिक व्हाया संगमनेर’ सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अचानक रद्द झाल्याने पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात प्रचंड रोष निर्माण झाला असून रेल्वेमंत्रालयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनांनी आकार घ्यायला सुरुवात केली आहे. तीन जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांसाठी समृद्धीचे द्वार ठरणार्‍या या रेल्वेप्रकल्पासाठी गेल्या साडेतीन दशकांपासून संघर्ष सुरु होता. मात्र रेल्वेमंत्र्यांनी ‘जीएमआरटी’ प्रकल्पाचा बाऊ करुन आंबेगाव, खेड, नारायगाव, जुन्नर, संगमनेर व सिन्नर या तालुक्यांमधील नागरिकांच्या अपेक्षा धुळीस मिळवल्याने या सर्वच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी संघर्षाचा एल्गार केला असून संगमनेर पाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही आंदोलन उभे राहत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रविवारी मंचरमध्ये झालेल्या बैठकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी या निर्णयाविरोधात आगपाखड करताना विमानतळ गेले आणि महामार्गही अर्धवट अवस्थेत असताना आता प्रस्तावित रेल्वेमार्गही रद्द झाल्याने आम्ही काय बैलगाडीतून प्रवास करायचा का? असा खडा सवाल उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांना या प्रकल्पाचे महत्व पटत नसल्यास ते पटवून देण्यासाठी प्रसंगी मोठे जनआंदोलन उभारण्याचीही तयारी ठेवा असा सूचक इशारा देत त्यांनी या रेल्वे प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यात आंदोलन उभारण्याची घोषणाही केली.


गेल्या साडेतीन दशकांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या ‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्गात खोडद जवळील जीएमआरटी प्रकल्पाचा अडसर निर्माण झाल्याचे कारण देत रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी या तिनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेताच परस्पर हा रेल्वेमार्ग रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात संताप निर्माण झाला असून अंतिम रेखांकनासह प्रत्यक्ष थेट खरेदीखतांद्वारा जमिनींचे भूसंपादन झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांना अचानक ‘जीएमआरटी’चा साक्षात्कार झाल्याने या निर्णयामागे राजकारण असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या प्रकल्पात येणार्‍या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, राजगुरुनगर (खेड), नारायणगाव, जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.


यासर्व पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रकल्पमार्गातील सर्व लोकप्रतिनिधींना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्नही केला आणि संगमनेरात त्यासाठी आंदोलनही उभेे करण्याची घोषणा केली. त्यातून प्रस्तावित रेल्वेमार्गाचा विषय तापत असतानाच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची भेट घेवून त्यांना रेल्वेमार्गात कोणताही बदल करु नये असे साकडे घालणारे निवेदन सादर केले आहे. तर, अकोल्यात कॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली कृती समिती स्थापन करुन सदरील प्रकल्प संगमनेर, अकोलेमार्गेच नेण्यात यावा अशी मागणी रेटण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी अकोल्याच्या गावागावांमध्ये सभा घेवून लोकसहभाग वाढण्यावर भर दिला असून मंगळवारी (ता.16) अकोलेकर या मागणीसह संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयावर येवून धडकणार आहेत.


पुणे जिल्ह्यातील आळेफाट्यातही या रेल्वमार्गासाठी नागरिक रस्त्यावर उतरले असून रविवारी कल्याण-अहिल्यानगर मार्गावर रास्तारोको करुन सरकारचे लक्षही वेधण्यात आले होते. आता या मागणीसाठी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह शिरुरचे माजी खासदार आणि या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून आग्रही असलेले शिवाजीराव आढळराव-पाटील मैदानात उतरले आहेत. त्यासाठी रविवारी (ता.14) मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात सर्वपक्षीय बैठकही बोलावण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या स्थानिक पुढार्‍यांसह नागरिकांनी दुष्काळी तालुक्यांचा कायापालट करणार्‍या या प्रकल्पासाठी प्रसंगी तीव्र जनआंदोलन उभारण्याची तयारीही दाखवली.


यावेळी माजीमंत्री वळसे-पाटील यांनी प्रस्तावित मार्गानेच हा रेल्वेप्रकल्प पूर्ण व्हावा आणि त्याच्या कामाला अधिक गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना सोबत घेवून प्रस्तवित मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची भेट घेवून ठामपणे मागणी करण्याची घोषणा करतानाच त्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र तसे न घडल्यास थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी जाहीर केले.


या प्रकल्पासाठी सुरुवातीपासूनच अतिशय आग्रही असलेल्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी खोडदच्या ‘जीएमआरटी’ प्रकल्पासाठी रेल्वेमार्ग रद्द करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत या प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांशी झालेल्या चर्चेतून दुर्बिणीच्या अँटेनापासून हा रेल्वेमार्ग 15 ते 20 किलोमीटर पश्‍चिमेकडे सरकवल्यास कोणतीही अडचण नसल्याचे त्यांचे मत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या तीन दशकांपासून या रेल्वेमार्गासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि पुणे, हडपसर, आळंदी, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिकरोड मार्गाचा मूळ नकाशाही उपस्थितांसमोर सादर केला. रेल्वेमंत्रालयाने जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांशी न बोलताच या प्रकल्पाचा बाऊ करुन तो अहिल्यानगर, शिर्डी, पुणतांबा मार्गे नाशिककडे वळवल्याने राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर व सिन्नर तालुके विकासापासून वंचित राहतील अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.


संगमनेर, अकोले पाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी आंदोलन उभे राहु लागल्याने येणार्‍या महिनाभरात जागोजागी त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीत सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात मूळ प्रकल्पाबाबत दिलासादायक निर्णय होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. तर, माजीमंत्री वळसे-पाटील यांनी पक्षीय भेद विरुन सर्वपक्षीयांनी या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहनही केले. त्यामुळे येणार्‍या कालावधीत पुणे-नाशिक व्हाया संगमनेर रेल्वेमार्ग चांगलाच चर्चेत आला असून पुढील दीड-दोन महिने अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे.


खोडदच्या ‘जीएमआरटी’ प्रकल्पाला अडसर निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करुन रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी पुणे-नाशिक व्हाया संगमनेर हा रेल्वेप्रकल्पच रद्द करण्याची घोषणा केल्यापासूनच पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात संताप निर्माण झाल्याने ठिकाठिकाणचे लोकप्रतिनिधीही आक्रमक होवू लागले आहेत. त्यात विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे व राजाभाऊ वाजे यांच्यासह आमदार सत्यजीत तांबे, अमोल खताळ, डॉ.किरण लहामटे, शरद सोनवणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, माजीमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केल्याने पुढील काळात पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी खेड, आंबेगावपासून सिन्नर, नाशिकपर्यंत आंदोलनाची राळ उठण्याची शक्यता आहे.

Visits: 98 Today: 2 Total: 1417157

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *