घारगावकरांच्या मागण्यांसाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद! बहुतेक मागण्या मान्य; पोलीस ठाण्याच्या जागेचीही अधिकार्‍यांकडून पाहणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एका तपापासून जागेच्या शोधात असलेल्या घारगाव पोलीस ठाण्यासह अन्य कार्यालयांच्या स्थलांतराविरोधात शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी सुरु केलेले अन्नत्याग आंदोलन यशस्वी होतांना दिसत आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे, मात्र मंगळवारीच महसूल, कृषी, वन व पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी तर आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळाला भेट देत त्यांच्या विभागाच्या कार्यालयासंबंधी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मात्र घारगावच्या वीज महावितरणच्या क्षमता वाढीसह महामार्गावरील प्रश्नांबाबत त्या विभागाच्या अधिकार्‍यांनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने त्यांच्या निर्णय येईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आहेर यांच्यासह घारगावकरांनी घेतला आहे. त्यासाठी आज (ता.27) सायंकाळी जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत या आंदोलनाला शेकडो नागरीकांनी भेटी देत पाठिंबा दर्शविला असून त्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे.

सन 2010 साली मंजूरी मिळाल्यानंतर मुळानदीच्या काठावर पठारभागासाठी स्वतंत्र घारगाव पोलीस ठाणे सुरू झाले. सुरुवातीला निधीच्या कमतरतेमुळे पोलीस प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या जुन्या इमारतीचा त्यासाठी वापर केला. पुढे 2015 साली गृह विभागाने पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत आणि अधिकारी व कर्मचार्‍यांची निवासस्थाने यासाठी 5 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर करीत तो पोलीस अधीक्षकांकडे वर्गही केला. त्यामुळे वरील दोन्ही इमारतींसाठी घारगाव परिसरात शासकीय जागेचा शोध सुरू झाला. या दरम्यान घारगाव व आंबीखालसा ग्रामपंचायतींनी आपल्या ताब्यातील शासकीय जमिनीही देवू केल्या, मात्र वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना त्या पसंद पडल्या नाहीत. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून इमारतींच्या बांधकामासाठीचा निधी पडून राहण्यासोबतच उभारणीचा खर्चही दुप्पट वाढला आहे.

अपुर्‍या सोयी आणि अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने नसल्याने घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचार्‍यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. याबाबत गेल्या 19 फेब्रुवारी रोजी दैनिक नायकने पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची समस्या मांडल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका कार्यक्रमात दैनिक नायकमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न तत्काळ निकाली काढण्याबाबत त्यांना आदेश दिले. त्यानुसार त्यांनी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांसह घारगावच्या पोलीस निरीक्षकांना तातडीने आवश्यक असलेली जागा पाहण्याच्या सूचना केल्या. त्यातून डोळासणे येथील 64 गुंठे शासकीय जागा समोर आली आणि घारगावचे पोलीस ठाणे डोळासण्यात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी पुढाकार घेत घारगावचे महत्त्व कमी होवू देणार नाही असे म्हणत पोलीस ठाण्याच्या स्थलांतरासह एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय पुन्हा घारगाव येथे सुरू करावे, बंद स्थितीत असलेले कृषी मंडल अधिकारी कार्यालय त्वरीत सुरू करावे, वन विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारत व कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, घारगाव महसूल मंडलासाठी स्वतंत्र मंडलाधिकार्‍यांची नियुक्ती, पुणे-नाशिक महामार्गावरील बंदस्थितीत असलेले पथदिवे (स्ट्रीटलाईट) तातडीने सुरू करावेत, आंबीखालसा फाटा, घारगाव, बोटा, साकूर फाटा, डोळासणे, कर्जुले पठार, 19 मैल, चंदनापुरी इत्यादी गावांच्या हद्दीतील पथदिव्यांसह अपूर्ण असलेली महामार्गावरील सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत व घारगाव महावितरण कंपनीच्या 5 एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफार्मर ऐवजी 10 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवावा अशा विविध मागण्यांसाठी गेल्या सोमवारपासून (ता.25) घारगाव बसस्थानकाच्या बाहेर अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, एकात्मिक बालविकास अधिकारी वैशाली कुकडे, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्यासह कृषी व वन विभागाच्या अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी जावून जनार्दन आहेर व घारगावकरांची भेट घेतली. यावेळी या अधिकार्‍यांनी त्यांच्या मागण्या मान्य करीत अपेक्षेप्रमाणे कार्यालये सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. आज (ता.27) सकाळी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनीही घारगावला जात त्यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी घारगाव देवस्थानाची महामार्गाच्या लगत असलेली एक एकर जागाही त्यांना दाखवली. त्यावर समाधान व्यक्त करीत त्यांनी त्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले.

एकंदरीत सेनेच्या तालुकाप्रमुखांनी केलेल्या एकूण मागण्यांपैकी बहुतेक सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा होवून प्रश्न मार्गी लागले आहेत. मात्र वीज वितरण कंपनी आणि महामार्ग प्राधिकरणाने अद्यापही त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नसल्याने जोपर्यंत या दोन्ही विभागांकडूनही सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यासाठी आज सायंकाळी आंदोलनस्थळी जाहीर सभाही होणार असून त्यातून या आंदोलनाचे स्वरुप अधिक व्यापक केले जाणार आहे. गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या कालावधीत घारगाव व आसपासच्या गावांमधून शेकडो ग्रामस्थांनी आंदोलनस्थळाला भेट देवून आहेर यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनस्थळाला भेट देणार्‍या नागरिकांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय असल्याने ‘टायगर अभी जिंदा है’ अशी चर्चाही घारगाव परिसरात सुरु झाली आहे.


2011 साली धर्मदाय आयुक्तांनी सदरील जागा उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या, मात्र काही कारणास्तव त्यात पुढील कारवाई झाली नाही. त्यामुळे हा विषय डोळासणे शिवारापर्यंत गेला. आता घारगाव देवस्थानाची जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली असून आज आंदोलनस्थळाला भेट देवून तसा प्रस्ताव लवकरात लवकर पोलीस अधीक्षकांना पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. मी देखील सदर जागेची पाहणी केली असून त्याबाबत सकारात्मकपणे अंतर्गत अहवाल सादर करणार आहे. पोलीस ठाण्याची इमारत व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाचा विषय लवकर मार्गी लागावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– राहुल मदने
उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

Visits: 27 Today: 1 Total: 117645

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *