अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन वाहतूक करणार्या वाहनावर पोलिसांनी कारवाई करुन 10 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, नायगाव येथील गोदावरी नदी पात्रातून चोरून वाळू वाहतूक होत आहेत. त्यानुसार बुधवारी (ता.27) त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदारांना छापा घालण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने छापा टाकून चोरटी वाळू वाहतूक करताना अनिल सोपान शेलार यास पकडले. त्याच्या ताब्यातून एक टेम्पो व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि फारुख ख्वाजा शेख याच्या ताब्यातून एक टेम्पो व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई नितीन शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिसांत वरील दोघा आरोपींविरोधात गुन्हा नोंद क्रमांक अनुक्रमे 132/2022, 133/2022 भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, पोहेकॉ.भारत जाधव, पोकॉ.नितीन शिरसाठ, चाँद पठाण, सुनील दिघे आदिंनी केली.