पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेची दुसर्‍या महिलेला मरण मिठी! दोघीही भाजल्या; खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही बाजूकडील एकोणावीस जणांवर गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील वादाच्या कारणातून दुसर्‍या गटाच्या तेरा जणांनी आपणास दगड, विटांनी मारहाण केली, घरातील सामानाची मोडतोड करुन एकाने आपल्या अंगावर पेट्रोल ओतले तर, दुसर्‍याने काडी लावली. त्यामुळे आपली साडी पेटल्याने आपण जवळच उभ्या असलेल्या महिलेला मिठी मारली, त्यातून त्या महिलेलाही दुखापती झाल्याची फिर्याद परीघा सूर्यवंशी या महिलेने दाखल केली. तर वाद मिटवण्याचे निमित्त करुन आपणास बोलावण्यात आले व नंतर दोघा महिलांसह दोघा पुरुषांनी आपणास पकडून ठेवले व त्या महिलेने स्वतः पेटून घेत आपणास मिठी मारुन व पेटवून देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद संध्या विलास खरे यांनी दाखल केली आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह विविध कलमान्वये दोन्ही बाजूच्या 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत भाजलेल्या दोन्ही महिलांवर सध्या उपचार सुरु आहेत. चक्रावून टाकणार्‍या या घटनेचे व्हिडिओही समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नसून प्रकरण तांत्रिक असल्याने त्याचा सखोल तपास केला जात आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली फिर्याद परीघा सहादू सूर्यवंशी (रा.अकोले नाका) यांनी दाखल केली आहे. त्यानुसार सोमवारी (ता.25) सकाळी साठेआठ वाजण्याच्या सुमारास त्या लगतच्या येडूआई मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. घरी परत आल्यानंतर त्यांच्या घरासमोर संध्या खरे ही महिला उभी होती. फिर्यादी महिला त्यांच्याकडे गेली असता बाळू, योगेश सूर्यवंशी, शिवानी योगेश सूयवंशी, सागर, मनोहर, सचिन, साक्षी, उमेश, स्वाती, विनोद सूर्यवंशी, त्याची बायको, संध्या खरे व बाळासाहेब (फिर्यादीला यातील कोणाचीही पूर्ण नावे माहिती नाहीत.) असे एकूण 20 ते 25 जण फिर्यादी महिलेजवळ आले.

यावेळी त्या घोळक्यातील कोणीतरी एकाने फिर्यादी महिलेस पाठीमागून विटकरीचा तुकडा फेकून मारला व उर्वरीत लोकांनीही त्या महिलेस मारहाण केली. त्या सर्वांच्या तावडीतून सदरची महिला निसटून घरात गेली असता योगेश नामक व्यक्तीने पेट्रोलची बाटली आणून तिच्या अंगावर ओतली, यावेळी सचिन, अरुणा नावाच्या व्यक्ती त्या महिलेस शिवीगाळ करीत होत्या. त्या दरम्यान जमावातील एकाने काड्यापेटीची काडी पेटवून पेट्रोलने चिंब झालेल्या फिर्यादीच्या दिशेने फेकल्याने त्या महिलेची साडी पेटली. त्यामुळे त्यांच्या हातापायासह मानेला दुखापती झाल्याने वेदना असह्य होवून त्यांनी जवळच उभ्या असलेल्या संध्या खरे यांना मिठी मारली. त्यामुळे ती महिलाही पेटल्याने जखमी झाली. यावेळी बाळू नावाच्या इसमाने पाणी टाकून आम्हास विझवले. कोणीतरी पोलिसांना फोन केल्याने पोलीस आले व त्यांनी त्या दोघींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले.

योगेश मनोहर सूर्यवंशी, मनोहर बाबुराव सूर्यवंशी, सागर मनोहर सूर्यवंशी, सचिन मनोहर सूर्यवंशी, उमेश मनोहर सूर्यवंशी, बाळासाहेब बाबुराव सूर्यवंशी या लोकांपासून आपणास गेल्या वर्षभरापासून त्रास असून रविवारी (ता.24) या सर्वांनी आपल्या घरात येवून आपणास शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, घरातील सामानाची तोडफोड करुन निघून गेले व सोमवारी (ता.25) सकाळी आपणास पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला अशा आशयाचा जवाब नोंदविला. त्यावरुन शहर पोलिसांनी वरील इसमांविरोधात भा.दं.वि. कलम 307, 323, 427, 504, 506, 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याच प्रकरणात पेटलेल्या महिलेने मिठी मारल्याने भाजलेल्या संध्या विलास खरे (रा.लालतारा वसाहत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या अकोले नाका परिसरातून आरोपी महिलांच्या घराजवळून जात असताना मथुरा सूर्यवंशी (रा.अकोले नाका) या महिलेने मागील भांडणं मिटवून घेवू म्हणून त्यांना बोलावले. यावेळी तेथेच राहणार्‍या परिघा सूर्यवंशी या महिलेने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मथुरा सूर्यवंशीसह अन्य दोन महिला व दोन पुरुषांनी त्यांना पकडून ठेवले. त्या दरम्यान परीघा सूर्यवंशी यांनी स्वतःच्या हाताने पेट्रोलची बाटली आपल्याच अंगावर ओतून पेटवून घेतले व फिर्यादी महिलेसही मिठी मारुन पेटवले व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाचा जवाब नोंदविल्याने पोलिसांनी मथुरा सूर्यवंशी, परीघा सूर्यवंशीसह दोन ओळखी महिला व दोन अनोळखी पुरषांविरोधात भा.दं.वि. कलम 307, 323, 143, 147 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेने संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.


अकोले नाक्यावरील भांडणांचा हा प्रकार नवा नाही. रोजच या परिसरात महिला व पुरुषांची भांडणे सुरु असतात. मात्र एकमेकांना पेटवून देण्याचा व त्यातून जीव देण्याचा व घेण्याचा हा प्रकार विरळाच आहे. या प्रकरणाचे व्हिडिओही सोशल माध्यमात व्हायरल झाले असून त्यात परीघा सूर्यवंशी या स्वतः पेटवून घेत असल्याचे दिसते व त्याचवेळी अन्य दोन महिला संध्या खरे यांना पकडून ठेवत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे या प्रकरणात दुसर्‍या पक्षाच्या 13 जणांची नावे पूर्वग्रह ठेवून गोवली गेली असल्याचे स्पष्ट दिसून येते. पहिल्या फिर्यादीत आरोप करण्यात आलेली एकही व्यक्ती या छायाचित्रणात कोठेही दिसत नाही, त्यावरुन ही गोष्ट सिद्ध होते. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करीत असून निष्पाप असलेल्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आहेत.

Visits: 100 Today: 1 Total: 1106962

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *